फोटो सौजन्य - Social Media
कल्याण शीळ रस्त्यावर पुन्हा एकदा तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे सामान्य नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी गंभीर होती की विद्यानिकेतन शाळेला दुपारच्या सत्रातील पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुट्टी जाहीर करावी लागली. या परिस्थितीवर मनसे नेते राजू पाटील यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर निशाणा साधला. त्यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचे गाणे ट्वीट करून, “धन्यवाद कुणाल कामरा, आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल,” असे म्हणत एमएमआरडीए आणि बिल्डर लॉबीवर जोरदार टीका केली.
कल्याण शीळ रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनला आहे. रस्त्याचे रुंदीकरणाचे काम दीर्घकाळ प्रलंबित आहे, त्यातच आता मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमएसईबी आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने वाहतूक व्यवस्थापन कोलमडले आहे. आज सकाळी मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेटिंग करण्यात आल्याने मानपाडा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने अडकली. याचा परिणाम ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांवर आणि शाळकरी विद्यार्थ्यांवर झाला. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या असून पर्यायी मार्ग नसल्याने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
या परिस्थितीवर मनसे नेते राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रशासनाला लक्ष्य केले. त्यांनी कुणाल कामराच्या गाण्याचा संदर्भ घेत एमएमआरडीए आणि बिल्डर लॉबीवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्वीटमध्ये “बिल्डरांची मेट्रो # एमएमआरडीए, # टक्केवारी, # कुणाल कामरा” असे लिहीत प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
धन्यवाद @kunalkamra88 , आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल ! #बिल्डरांची_मेट्रॅा #MMRDA #MSRDC #टक्केवारी #kunal_kamra pic.twitter.com/R7smgHaymm
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 26, 2025
कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी दररोजची समस्या झाली आहे. शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रो आणि रस्त्याच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि राजकीय नेते करत आहेत.