सांगली जि.प.मध्ये खातेवाटपावरून वाद; काँग्रेस आक्रमक
जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षा संगिता पाटील यांनी विषय समिती सभापतींना प्रभार सोपविण्यात आला. दरम्यान उपाध्यक्ष आणि दोन विषय समित्यांच्या खाते वाटपावरुन खाते वाटपावरुन चांगलाच खल झाला. खातेवाटप आणि समिती सदस्यांच्या निवडीवरुन वाद मिटत नसल्याने दुपारी दोन वाजता आयोजित केलेली सभा सव्वातीन वाजता सुरु झाली. प्रारंभी सभेत नूतन पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी उपाध्यक्षांकडे कृषी आणि पशुसंवर्धन विभाग होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तोच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काँग्रेसकडे अकरा सदस्य असताना उपाध्यक्ष लाड यांना कमी दर्जाचे खाते मिळणार असल्याने काँग्रेस नेते आणि सदस्य आक्रमक झाले. परंतु काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे खात्यांमध्ये बदल करण्यात आला. अजितदादा गटाच्या सावित्री रवि-पाटील यांना शिक्षण आणि आरोग्य खाते देण्याचा निर्णय यापूर्वी नेत्यांनी घेतला होता. परंतु काँग्रेसच्या भूमिकेमुळे त्यांचे खाते बदलण्यात आले.
ऐनवेळी खाते बदल करण्यात येत असल्याने सावित्री तम्मनगौडा रवि-पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु आघाडीतील नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारी उशिराने बड्या नेत्यांच्या मध्यस्थीने रवि-पाटील यांची नाराजी दूर करण्यात यश आले. उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना शिक्षण आणि आरोग्य विभागाचा पदभार सोपविण्यात आला. सभापती सावित्री रवि-पाटील यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी तर सभापती पृथ्वीराज पाटील यांना बांधकाम खाते देण्यात आले. यावेळी समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, महिला बालकल्याण सभापती स्नेहल मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त सीईओ मनोज जाधव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह सदस्य आणि खातेप्रमुख उपस्थित होते.
उपाध्यक्ष ऋषीकेश लाड आणि सभापती सावित्री तम्मनगौडा रवि-पाटील यांच्यातील खातेवाटपावरुन मतभेद झाले. सावित्री रवि-पाटील यांचे बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्या नाराज झाल्या. काही नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आ. जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर रवि-पाटील खाते बदलावर राजी झाल्या. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला पाठींबा देताना अजितदादा राष्ट्रवादीला दोन सभापती देण्याचा निर्णय झाला होता, त्यामध्ये शिक्षण-आरोग्य आणि महिला बालकल्याण समितीचा समावेश होता. मात्र खातेवाटपापूर्वी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याने खातेबदल झाले.
निवडणूकीच्या निकालानंतर आघाडीच्या नेत्यांनी शिक्षण आणि आरोग्य खाते देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जयंत पाटील, डॉ विश्वजित कदम आणि अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांच्या आग्रहाखातर इच्छा नसताना देखील जि. प. चा कारभार सुरळीत चालण्यासाठी आणि ग्रामिण भागातील शेतकर्यांसह सर्व घटकांना न्याय मिळावा म्हणून ही खाती घेतली. सव्वा वर्षानी शब्द दिलेली खाती देण्याचे अश्वासन सर्व नेत्यांनी दिले आहे. मिळालेल्या खात्यांना चांगल्या प्रकारे न्याय देवू, अशी प्रतिक्रिया सावित्री तम्मानगौडा रवि-पाटील यांनी दिली.
Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू






