
सुनील तटकरेंची सुनेत्रा पवारांसमोरच भुजबळांवर आगपाखड
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत होते. पुण्यातील राज्यसभेच्या जागेवरून मंत्री छगन भुजबळ आणि इतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद उफाळून आल्याचे दिसत आहे. छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहेत. छगन भुजबळांना राज्यसभा सदस्यत्व आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद या त्यांच्या मागणीला मान्यता न मिळाल्याने त्यांनी आपण कबड्डीचा खेळाडू असून बुद्धिबळाचा खेळाडू नसल्याचे विधान केले होते. आता यावरूनच सुनील तटकरेंनी भुजबळांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्तच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरच भुजबळांच्या विधानाचा समाचार घेतला.
यावेळी सुनील तटकरे म्हणाले, “पक्षाचा १९९९ ते २०२६ हा कार्यकाळ झाला आहे, पण आपलं लाडकं नेतृत्व नाहीये. राज्यातील प्रत्येक नागरिकाला दादांची आठवण येते. दादाचे विचार हीच माची ऊर्जा आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. आता भाजप हा राज्यातील एक नंबरचा पक्ष आहे पण, २००४ साली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष राहिला होता. अजित पवार यांनी खूप काम केलं म्हणून आपला पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना तटकरे पुढे म्हणाले, “छगन भुजबळ हे कबड्डीचे खेळाडू आहेत. ते सिनेकलाकार आणि निर्माते आहेत. छगन भुजबळ यांनी कबड्डीमध्ये एक-एक खेळाडू बाद केले आहेत. एका वेळेस सर्व खेळाडूंना ते बाद करतात. छगन भुजबळ शिवसेनेत असताना त्यांनी दोन वेळा महापौरपद मिळवलं. मग तेव्हा त्यांनी कोणाला चेकमेट केलं? आपल्या पक्षात सर्व प्रकारचे खेळाडू आहेत आणि हे सर्व खेळाडू अजितदादांनी तयार केलेले आहेत,” असे ते यावेळी म्हणाले.
तटकरे यावेळी म्हणाले, “२००४ साली काँग्रेसकडून जागा सोडवून घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि अजित दादांनी त्यावेळेस काँग्रेससोबत कटुता घेतली होती. २००४ साली विदर्भातून आपण सर्वात जास्त जागा मिळवल्या होत्या. ज्याच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या ज्याच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या त्यांचा मुख्यमंत्री असं जर २००४ ला ठरलं असत तर आपला मुख्यमंत्री बसला असता. २०१४ साली राज्यात ध्रुवीकरण झालं. २०१९ चा शपथविधी म्हणजे हा पहाटेचा शपथविधी नव्हता. पण तेव्हा सोबत असतो तर काही काळानंतर पुढे गेलो असतो,” असे ते यावेळी म्हणाले.