काही जण कष्ट न करताच पुढे जातात
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराजीच्या चर्चा असतानाच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा सूचक आणि अर्थपूर्ण वक्तव्ये करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. गेल्या २६ वर्षांत अनेक जण मेहनत आणि कष्टाच्या जोरावर पुढे आले. काही मात्र कष्ट न करताही मोठी पदे मिळवतात, असे वक्तव्य करत त्यांनी पक्षातील घडामोडींवर अप्रत्यक्ष भाष्य केले.
मुंबईत माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, पक्षासाठी प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. मतभेद झाले म्हणून घर सोडत नाही, तर आपली मते मांडतो. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यसभेसाठी भुजबळ हे इच्छुक होते. मात्र, पुतण्या समीर यांना मंत्रिमंडळात घेण्याची अट त्यांनी घातल्याची चर्चा होती. त्यावर निर्णय न झाल्याने त्यांनी राज्यसभा टाळल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. यावेळी भुजबळ यांनी पक्षात इतर नेत्यांच्या कुटुंबियांना मिळणारा न्याय आपल्यालाही मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
NCP Rajya sabha Candidate : भुजबळांचा पत्ता कट; राष्ट्रवादीकडून बड्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी व्यक्त करतानाच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कौतुक केले. अजित पवार पुढे गेल्यानंतर सुनेत्रा ताई यांनी पक्षाची धुरा सांभाळली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जाईल आणि मोठी प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन
यावेळी भुजबळ यांनी कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन केले. पक्षाने आपल्याला काहीच दिले नाही, अशी भावना अनेकांच्या मनात असते. मात्र, पदे मर्यादित असतात आणि पक्ष सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांनी एकजुटीने आणि सातत्याने काम करत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
पदे मर्यादित, पक्षाचा न्याय देण्याचा प्रयत्न
पदे मर्यादित असली, तरी पक्षाचा सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे. ताकद, चमत्कारालाही नमस्कार होतो. तुमच्यापाठी किती आमदार, खासदार, नगरसेवक आहेत, यावर सर्व अवलंबून असते. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष मोठी प्रगती करेल.
– छगन भुजबळ, मंत्री आणि नेते राष्ट्रवादी काँग्रेस






