फोटो - सोशल मीडिया
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रचाराचा नारळ फोडला गेला असून जोरदार धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न मविआ समोर आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदावरुन केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये नवीन चर्चांना उधाण आले. पुढचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच असेल असे थेट वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. यावर आता शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधल. यावेळी त्यांनी कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री या वक्तव्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राज्यामध्ये दिवाळीनंतर विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, “महाराष्ट्रातील जवळपास सर्व बैठका आता शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्यात काँग्रेसला, महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील, असे दिसत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, अशी आमचीही इच्छा आहे. त्यात आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. पण हा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यावर खासदार सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. याबाबत त्या म्हणाल्या की, “प्रत्येक पक्षाला आणि कार्यकर्त्याला आपला नेता आपला पक्ष मोठा व्हावा, अशी अपेक्षा असते, त्यात गैर काहीही नाही”, असे सूचक विधान खासदार सुप्रिया सुळे केले. त्याच बरोबर शरद पवार गट मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये नाही का असा प्रश्न माध्यमांनी विचारला. यावर उत्तर म्हणताना, , “राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका शरद पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी मांडली होती. आम्ही कोणत्याही शर्यतीत नाही. हे त्यांनी स्पष्ट केलं होतं”, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वीपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यापूर्वी राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सुरु होते. बंडखोरीच्या राजकारणानंतर आता ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील अशा आशयाचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु झाली. कॉंग्रेस नेत्यांनी देखील लोकसभेमध्ये चांगले काम केल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण झाला होता. यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी सामंजस्यांची भूमिका घेत निवडणूकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात येईल अशी भूमिका घेतली आहे.