मंत्रीमंडळातून धनंजय मुंडे बाहेर तर छगन भुजबळ आत येणार असल्याचा विजय वडेट्टीवार दावा आहे (फोटो - सोशल मीडिया)
नाशिक : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळाले. मात्र महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि जागावाटपावरुन नाराजी पसरली आहे. यामध्ये अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. तर बीड हत्या प्रकरणामध्ये मास्टर माईंड आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे. त्याने आत्मसमर्पण केले असून 14 दिवसांची न्यायालयीन कठोडी सुनावण्यात आली आहे. या बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. यामुळे आता धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर तर छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामध्ये दाखल होणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे. विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर होईल असा मोठा दावा देखील केला होता. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले जाणार असल्याचा दावा देखील केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
विजय वडेट्टीवार म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता कदाचित मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट काढली जाऊ शकते. धनंजय मुंडे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता किंवा असा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे का? असा प्रश्न आम्हाला चार ते पाच दिवसांपासून पडलेला आहे. कारण अजित पवार हे बीडच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत. यामध्ये छगन भुजबळ यांना कदाचित ‘वेट अँड वॉच’ची भूमिका ठेवावी लागेल. अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसरा पर्याय असेल. कारण भेटीमध्ये काहीतरी ठरलं असेल”, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे विजय वडेट्टीवार यांनी बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्किम कराड याचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, , “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊटर होऊ शकतो. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काऊंटर करु नका. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. आपण कराडचे एन्काऊटर करण्याची माहिती उच्चपदस्त अधिकाऱ्याने दिल्याचा दावा त्यांनी केला”. विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर होणार असल्याचा बडा दावा केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.