कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर युद्धबंदीवरुन निशाणा साधला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी सुरु आहे. त्यामुळे सीमा भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र ही मध्यस्थी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे राज्यातील विरोधकांनी टीका केली आहे. भारत स्वतंत्र राष्ट्र असताना अमेरिकेने निर्णय घेतल्यामुळे कॉंग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. राज्यातील कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, भारत अमेरिकेपुढे का झुकला हा प्रश्न विचारला जात आहे. निवडणुकापूर्वी सत्तेत येण्यापूर्वी ज्या ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले, त्याच पद्धतीने बोलावं अशी अपेक्षा भारतीयांची होती. जनतेत विश्वासावरून विश्वासघाताची भावना वाढायला लागली आहे. सैन्य इतकं ताकदवर असताना झुकण्याची काय गरज होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात अमेरिकेपुढे आम्ही झुकणार नाही असं वाक्य आलं असतं तर बरं वाटलं असतं. पंतप्रधान वारंवार भाषणात पाकिस्तानचं नाव घेत होते त्या चिल्लर देशाला एवढी भाव देण्याची गरज होती. पण पंतप्रधानांचा कालच भाषण अमेरिकेला इशारा देणारा असायला पाहिजे होतं, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पहिले डोनाल्ड ट्रम्पचं भाषण झालं. त्यानंतर आमच्या देशाचं पंतप्रधानाचे भाषण झालं. पाकिस्तानात घुसायला पाहिजे पण सैन्य आमचे ताकदवर आहे. सैन्यांना अधिकार दिले होता त्यावर त्यांनी ठाम राहायला पाहिजे होते. काल पंतप्रधान यांच्या भाषणात निराशा आणि हतबलता दिसली, अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जातीय जनगणनेचा निर्णय बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे. जातीय जनगणना ही कर्म प्राप्त होती आणि त्याची आवश्यकता होती. कोणी ओबीसीची आमची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे फळ भोगावे लागतील तो प्रयत्न कोणीही करू नये त्यावर आमचं लक्ष असणार आहे,” असे देखील मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते राज ठाकरे आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची भेट झाली आहे. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असल्याची ताकद राज ठाकरे यांची आहे. सगळ्यांना राज ठाकरेंची गरज पडायला लागलेली आहे. या लोकांच्या चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करत आहे. ज्या पक्षाचा एकही आमदार नाही, त्या पक्षाकडे जाऊन हे चपला झिझवत असेल तर यांची स्थिती किती डोलाईमान आहे. जनाधार गमावल्याची भीती असल्याने निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नसल्याने राज ठाकरेची भेटी घेत आहे,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
त्याचबरोबर राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, “तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई घोषित करावी. नैसर्गिक आपत्तीत एनडीआरएफ आणि एचडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्राकडे मागणी करून मदत मिळवून शेतकऱ्यांना द्यावी. जीएसटीच्या रुपाने शेतकऱ्यांना केंद्र सरकार लुटत आहे मात्र मदती स्वरूपात पैसे देताना हात आखळता आहे,” अशा शब्दांत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.