(फोटो- ट्विटर)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सध्या सुरू आहे. आज अजित पवारांनी बारामतीमधील एका मेळाव्याला संबोधित केले. यावेळी मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बारामतीतून निवडणूक लढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता बारामतीवासियांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले होते. तर आज दुसऱ्या दिवशी युगेंद्र पवार यांनी आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी प्रचार करणार आहेत.
ही स्वाभिमानी यात्रा १२ दिवसांची असून बारामती तालुक्यातील सर्व गावांना युगेंद्र पवार भेटी देणार आहेत. पक्षाच्या वतीने या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात स्वत:च्या घेतलेले छायाचित्र या स्वाभिमान यात्रेच्या पोस्टरवर छापण्यात आले आहे. ‘आदरणीय शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि ‘पवारसाहेबां’चा पुरोगामी प्रागतिक विचार बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. यामध्ये जनतेशी मुक्त संवाद करणार आहे. साहेबांनी सांगितल्या प्रमाणे ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही, ना यापुढे झुकेल’ या स्वाभिमानी विचाराचा जागर करण्यासाठी, या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्यांचे मनोबल आणखी वाढविण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी बारामतीकरांना भेटणार आहे. तसेच लोकसभेत दिलेल्या साथीबद्दल बारामती तालुक्यातील जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. बारामतीकरांनी या यात्रेमध्ये अवश्य सहभागी व्हावे.यात्रेच्या निमित्ताने स्वाभिमानी विचारांचा चौफेर जागर करुया’, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोणाला संधी देतात, हे सांगता येत नाही. मात्र आपण सुरुवातीपासूनच त्यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या संपर्कात आहोत. बारामती मध्ये अनेक प्रश्न आहेत. यामध्ये नवीन रोजगार निर्मितीचा प्रश्न समोर आहे. आणखी नवीन उद्योग कसे आणता येतील, याकडे लक्ष दिले जाईल.
-युगेंद्र पवार
दरम्यान राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. महायुतीमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यंदा बारामतीमधून निवडणूक लढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. मेळाव्यातील भाषणामुळे अजित पवार कदाचित बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे पुत्र पार्थ किंवा जय पवार यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांना जिव्हारी लागला आहे. विकास कामे करून देखील बारामतीत हरलो असे वक्तव्य त्यांनी आज केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चाना उधाण आले आहे.






