तुम्ही फक्त लढा.. आम्ही पाठीशी आहोत...
अकलूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची भेट झाली. त्यामध्ये मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये सामील होत असल्याचे पक्के झाले आहे. त्यामुळे आता डॉ. मोहिते पाटील हे अकलूज नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हावर लढवतील. त्यासाठी लागणारे एबी फॉर्म मी सोबतच घेऊन आलो असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील कुटुंबियांचा पक्षात प्रवेश झाल्याची अधिकृत घोषणा केली.
नगर परिषद निवडणुका संपताच एक मोठा कार्यक्रम अकलूजमध्ये घेणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी परवा दिवशी अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. अकलूज नगर परिषद निवडणूकीच्या ऐन तापलेल्या वातावरणात धवलदादा अजित पवार यांना भेटून आल्यामुळे सगळी राजकीय गणिते बदलली आहेत. अगदी काल पर्यंत भाजपा आणि शिवरत्न बंगल्यावर उमेदवारांच्या मुलाखती सुरु होत्या.
हेदेखील वाचा : महाराष्ट्रात १९ लाख नवीन मतदार, निवडणूक आयोगाने ७ महिन्यांत ४००,००० नावे वगळली, मतदारांमध्ये सर्वाधिक वाढ कुठे झाली?
दरम्यान, धवलदादांच्या गटात मात्र शांतता होती. पण आज अचानक पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी आमच्या 27 उमेदवारांची यादी तयार असून आम्ही उद्याच सगळे अर्ज भरणार असल्याचे सांगत निवडणूकीतील चुरस वाढवली आहे.
तुम्ही फक्त लढा, आम्ही तुमच्यासोबत
डॉ. मोहिते पाटील यांना अजित पवारांनी कोणत्याही प्रसंगात खंबीर साथ देण्याचे आश्वासन देत तुम्ही फक्त लढा, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे धवलदादांच्या गटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्ते अकलूज नगर परिषद निवडणूकसाठी सज्ज झाले आहेत. अकलूजची निवडणूक ही पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे तर माळशिरस तालुक्याची सर्व जबाबदारी धवलदादांकडे देण्यात आली आहे.
खरी लढत भाजपा आणि जयसिंह मोहिते पाटील गटात होईल अशी शक्यता काल-परवापर्यत वाटत होती. धवलसिंह मोहिते पाटील गटाने जरी निवडणुकीचा यल्गार केला होता, तरी त्यांना सर्व प्रभागातून उमेदवार मिळतीलच अशी शक्यता कोणालाही वाटत नव्हती. परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रभागातील 26 उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाकरिता आवश्यक असलेल्या शेड्युल कास्टच्या महिला उमेदवार म्हणून ऍड. देवयानी सुधीर रास्ते यांच्या नावाची घोषणा उमेश पाटील यांनी केली. त्यामुळे धवलदादा गटाने शांततेत राहून क्रांती केल्याचे बोलले जात आहे.
सध्या स्वबळाचा नारा पण पुढे…
अद्यापतरी आम्ही स्वबळाचा नारा दिला आहे. पुढे जाऊन बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय घेऊ असे पदमजादेवी मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी उर्वशीराजे मोहिते पाटील, सुरेश पालवे, शिवाजी देशमुख, अक्षय भांड, अतुल सरतापे, सुधीर रास्ते, माणिकबापू मिसाळ, मयूर माने, ज्योती कुंभार व मोठ्या संख्येने जनसेवेचे कार्यकर्ते उपस्थित होते.






