फोटो सौजन्य - Social Media
‘मॉक ड्रिल’ म्हणजे संकट येण्यापूर्वीची तयारी, जसं की आग लागल्यावर कसं बाहेर पडायचं, भूकंप आला तर कोणत्या कोपऱ्यात जावं, किंवा शत्रू हल्ला करेल तर आपली सुरक्षा यंत्रणा कशी काम करेल. पण ही कल्पना काही नवीन नाही. आपल्या भारतात हजारो वर्षांपूर्वीपासून धर्मग्रंथांमध्ये अशा प्रकारच्या तयारीचा उल्लेख आहे पण थोडा वेगळ्या पद्धतीने, आध्यात्मिकतेच्या रूपात.
गीता: मानसिक तयारीचं उत्तम उदाहरण
श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धात उतरायला सांगतात, पण आधी त्याचं मन शांत करतात. “योगस्थ: कुरु कर्माणि…” या श्लोकात ते सांगतात की भावनांवर नियंत्रण ठेवा, यश-अपयशाचं विचार न करता आपलं कर्तव्य करा. हे मानसिक ‘मॉक ड्रिल’चं उदाहरण आहे. अंतर्मन मजबूत केलं की बाहेरची आपत्ती लहान वाटते.
रामायण: लंकेच्या युद्धापूर्वीची तयारी
रामाने वानर सेनेला आधी संघटित केलं, समुद्र पार करण्यासाठी सेतू बनवला, हनुमानाला आधीच लंकेत पाठवून शत्रूची माहिती मिळवली. ही सगळी तयारी म्हणजेच एक व्यवस्थित रणनीती आणि कृतीचा सराव. त्यामुळं लढाई सुरू होण्याआधीच विजयाचं बीज पेरलं गेलं.
महाभारत: युद्धाचं प्रशिक्षण आणि सराव
द्रोणाचार्यांनी पांडव आणि कौरवांना बालपणापासूनच शस्त्रविद्या, नीती, युद्धतंत्र शिकवलं. अर्जुन-कर्ण यांच्या सराव लढती म्हणजे त्याकाळातली ‘मॉक ड्रिल’. संकट आलं की ज्यांनी आधी तयारी केलीय, त्यांचाच विजय होतो हे इथं दिसतं.
वेद-उपनिषद: सजगतेचा आध्यात्मिक सराव
वेदांमध्ये अग्नी, जल, वायू यांचे सकारात्मक आणि विनाशकारी रूप सांगितले आहे. यज्ञ, मंत्र, ध्यान या सगळ्यांतून मानसिक एकाग्रता वाढवली जाते म्हणजे सामूहिक मानसिक मॉक ड्रिलच.
गरुड पुराण: मृत्यूपूर्वीची मोक्ष तयारी
मृत्यूला सामोरे जाण्याची आध्यात्मिक तयारी, कर्म आणि साधनेचा सराव हे गरुड पुराण सांगतं. म्हणजे शेवटच्या क्षणांची ‘मोक्ष ड्रिल’.
गुरुकुल: शारीरिक, नैतिक आणि मानसिक सरावाचे केंद्र
गुरु-शिष्य परंपरेत लहानपणापासूनच शिस्त, ज्ञान, नैतिकता आणि संकटप्रतिक्रिया शिकवली जात असे. गुरुकुल म्हणजे संकटप्रसंगात नेतृत्व निर्माण करण्याचं केंद्र.