गणपती बाप्पा म्हटलं की मोदक आठवतात त्याचबरोबर आठवतो तो उंदीर मामा. असं म्हणतात की, उंदीर गणपती बाप्पाचं वाहन आहे. पण एवढासा उंदीर बाप्पाचं वजन कसं बरं पेलवतो ? हा प्रश्न लहानांबरोबर मोठ्यांना देखील पडलेला असतो. असं काय घडलं की बाप्पाने उंदीर मामाला त्याचं वाहन म्हणून निवडलं? नेमकं असं काय झालं की बाप्पा आणि उंदीर मामाची भेट झाली ? यावप एक गोष्ट सांगितली जाते काय आहे ही आख्यायिका जाणून घेऊयात.
गणपती बाप्पाला जितके मोदक प्रिय आहे तेवढाच प्रिय आहे तो म्हणजे उंदीर. बाप्पाचं हे वाहन जरी असलं तरी बाप्पा या पिटुकल्या उंदीरावर खूप प्रेम करतो. याचीच एक दंतकथा देखाील सांगितली जाते. किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम पेजवरुन ओमकार सावंत यांनी माहिती दिली आहे.
झालं असं होतं की, स्वर्गात क्रौंच नावाचा एक गंधर्व होता. या गंधर्वाचा स्वभाव अतिशय चंचल आणि मस्तीखोर होता. त्याच्या या स्वभावामुळे एकदा इंद्रसभेत वामदेवाला त्याचा चुकून पाय लागला. क्रोधीत झालेल्या वामदेवाने क्रौंचाला श्राप दिला. वामदेव म्हणाले क्रौंचाला म्हणाले की, तू उंदीर होशील असा मी तुला श्राप देतो. या श्रापामुळे क्रौंच उंदीर झाला आणि पराशरमुनींच्या आश्रमात गेला. गंधर्व क्रौंच उंदीर झाला तरी त्याचा मूळ मस्तीखोर स्वभाव काही गेला नाही. पराशरमुनींच्या आश्रमात राहत असताताना या पिटुकल्या उंदीराने सर्व धान्य आणि सामानाची नासधूस केली.
आश्रमातील इतर ऋपी आणि पराशरमुनींना या उंदीराने सळो की पळो करुन सोडलं. त्याच्या या त्रासाला कंटाळून अखेर पराशरमुनींनी गणपतीची बाप्पाची प्रार्थना केली आणि बाप्पाकडे मदत मागितली. त्यानंतर बाप्पाने त्याच्या हातातील पाश म्हणजेच दोरखंडाने बांधलं उंदीर जायबंदी झाल्याने बाप्पाला त्याची दया आली आणि पाहिजे तो वर माग असं बाप्पाने सांगितलं. मात्र ऐकेल तो उंदीर कसला. आडमुठ्या उंदराने बाप्पाला सांगितलं मी तुझ्याकडे वर मागणार नाही त्यापेक्षा तुच माझ्याकडे हवं ते माग. बुद्धीची देवता असलेला बाप्पा म्हणाला ठिके मी वर मागतो. आजपासून तू माझं वाहन होशील. बाप्पाच्या या वरामुळे उंदराला पश्चाताप झाला मात्र तोवर वेळ निघून गेली होती. बाप्पाचं वाहन होण्यापलीकडे उंदराला पर्याय राहिला नाही. असं जरी असलं तरी गणपती बाप्पाने या उंदराला कायमच मानाने वागवलं. म्हणूनच गणेशपूजनाच्या मूर्तीबरोबर उंदीरमामा देखील असतो. बाप्पाच्या गोष्टीतून एकच कळतं की,आपल्याहून दुर्बल असलेल्या आधार देत त्यांना सक्षम करावं.बाप्पाने उंदराच्या बाबतीत हेच केलं म्हणून पिटुकल्या उंदराला बाप्पाचं वजन सहज पेलवतं.