फोटो सौजन्य- pinterest
हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते ती म्हणजे गुढीपाडवा या सणाने. या दिवशी सर्वच ठिकाणी अगदीमोठ्या उत्साहात स्वागतयात्रा काढली जाते. या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई, अबालवृद्ध सहभागी होतात. यावर्षी गुढीपाडवा गुरुवार, १९ मार्च रोजी आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का यात्रेची सुरुवात कुठून आणि कोणत्या साली झाली, स्वागतयात्रेचा इतिहास काय आहे ते जाणून घ्या..
आज सर्वत्र नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची परंपरा रुढ झाली आहे. हिंदू संस्कृतीचा अभिमान व्यक्त करणे, नववर्षाचे सामुहिक स्वागत करणे, समाजात एकता आणि संस्कारांचा संदेश देणे या उद्देशाने यात्रेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील विविध शहर आणि परदेशांतून नववर्ष स्वागत यात्रा पाहायला मिळते. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या स्वागतयात्रेची सर्वप्रथम मुहूर्तमेढ १९९८ साली ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरातून झाली आणि त्यानंतर ती पुढे राज्यभर आणि देशभरात पोहोचली. कारण त्याचा हेतू प्रामाणिक होता. धर्माभिमानी होता.. यासाठी डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने सुरू केलेला आणि आता महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या देशाचे किंबहुना साऱ्या जगाचे आकर्षण ठरलेला उपक्रम म्हणजे नववर्ष स्वागतयात्रा. १९९९ साली आबासाहेब पटवारी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला डोंबिवलीत प्रारंभ झाला. जगभर ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षाला निरोप दिला जातो आणि नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. स्वागतासाठी रोषणाई होते हे खरेच; परंतु निरोपाच्या नावाखाली जो मद्यधूंद नंगानाच घातला जातो तो रोकावा, त्याला सकारात्मक-संस्कारात्मक उपक्रमाची जोड द्यावी, या उद्देशातून १९९९ सालीच सुरू होत असलेल्या युगाब्द ५००१ च्या निमित्ताने ‘स्वागत नववर्षाचे’ असा उपक्रम हाती घेतला गेला.
पाडव्याला, चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाला हा उपक्रम सुरू करावा, तो केवळ मंदिराचा उपक्रम न बनता संपूर्ण गावाचा, सकल हिंदू समाजाचा व्हावा, यासाठी शेकडो संस्था, निवासी सहकारी संस्था यांच्याशी संपर्क करण्यात आला. पाडव्याचा मुहूर्त यासाठी शोधण्यात आला आणि आदल्या रात्री नागरिक-महापालिका यांच्या सहकार्याने शहर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येऊन बिनआवाजाच्या फटाक्यांचे प्रदर्शन, संभाजी महाराज पुण्यतिथी साधून देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ लागले, तर पाडव्याच्या दिवशी भारतीय वेशात हजारो नागरिकांनी एकत्र जमून शहरभर प्रभातफेरीच्या धर्तीवर मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. डोंबिवलीने सुरू केलेल्या आणि गणेश मंदिराने नेतृत्व केलेल्या या उपक्रमाने इतिहास रचला गेला. हा उपक्रम पक्षीय राजकारणापासून दूर राहावा, तो केवळ महाराष्ट्रीय वा मराठी भाषिक समाजापुरता न राहता सर्वभाषिक डोंबिवलीकर त्यात सहभागी व्हावेत, या संपूर्ण उपक्रमासाठी कुणीही प्रायोजक नसावेत, समाजाने-नागरिकांनी-संस्थांनी स्वतःच्या खिशातून पैसे घालून त्यात सहभागी व्हावे किंबहुना मंदिराच्या उपक्रमाला हातभार लागेल. या आवाहनाला संपूर्ण डोंबिवलीकरांनी पाठिंबा तन मन आणि धनही अर्पण केले. २०२०-२१ साली कोविडमुळे स्वागतयात्रांचे आयोजन होऊ शकले नव्हते. त्यानंतर पुन्हा स्वागतयात्रेची त्याच उत्साहाने सुरुवात झाली आणि अविरतपणे ती आताही सुरूच आहे. यंदाचे हे 28 वे वर्ष आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी गणेश मंदिर संस्थानच्या वतीने सकाळी ६.३० वाजता भागशाळा मैदान येथे सर्व डोंबिवलीकर एकत्र येतात. पारंपरिक वेशभूषा, ढोल – ताशा पथक, लेझीम पथक, अनेक समाजसेवी संस्था यामध्ये सहभागी होतात. एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि स्वागतयात्रेची सुरुवात होते. विविध संकल्पनांवर आधारित ही स्वागतयात्रा असते. यावेळी पहिला मान गणेश मंदिर संस्थानचा असतो. पालखी आणि ढोल-ताशा पथक याने स्वागतयात्रेची सुरुवात होते. यामध्ये अनेक संस्था, मंडळे सहभागी होतात आणि सकाळी १० वाजताच्या सुमारास यात्रेची गणेश मंदिर येथे सांगता होते.
यावर्षीच्या स्वागतयात्रेची संकल्पना वंदे मातरम् चे १५० वे वर्ष या संकल्पनेवर आधारित आहे. गणेश मंदिर संस्थांनातर्फे ज्या ठिकाणांहून स्वागतयात्रा जाते, त्या त्या ठिकाणी संस्कार भारतीतर्फे मोठ मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. या व्यतिरिक्त नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित असते. यावेळी गणेश मंदिर संस्थांनातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक मान्यवरदेखील स्वागतयात्रेमध्ये सहभागी होतात. त्यासोबतच राजकीय पक्षांकडून व्यासपीठ बांधून फुलांची उधळण करत स्वागतयात्रेचे स्वागत केले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नववर्ष स्वागतयात्रा म्हणजे गुढीपाडवा या दिवशी काढली जाणारी भव्य सांस्कृतिक मिरवणूक. या यात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, लेझीम, चित्ररथ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते.
Ans: आधुनिक स्वरूपातील नववर्ष स्वागतयात्रेची सुरुवात 1999 साली ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथून झाली त्यानंतर ही परंपरा हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाली.
Ans: मराठी संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणे, हिंदू नववर्ष सार्वजनिकरित्या साजरे करणे आणि तरुण पिढीला परंपरा व संस्कृतीशी जोडणे हा स्वागतयात्रा सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश होता.






