नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे स्त्रीशक्तीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. आदीमाया जगदंबेची नऊ वेगवेगळी रुपं आणि त्या रुपांच प्रतिनिधत्व करणारे रंग देखील आहेत. यंदाच्या पहिल्याच दिवशी पहिल्या माळेचा रंग आहे म्हणजे पांढरा. हा पांढरा रंग प्रतिनिधित्व करतो ते म्हणजे देवी शितळामातेचं. या पांढऱ्या रंगाचं नेमकं काय महत्व आहे ते शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊयात.
माहिमची शितळादेवी ही प्रामुख्याने कोळी समजाची देवता आहे. पालघर,ठाणे आणि मुंबई भागातील कोळी समाज या देवीला खूप जास्त मानतो. शितळादेवी ही पावित्र्य़ाचं शांततेचं प्रतीक आहे. शितळा म्हणजे तिचा स्वभाव शितल शांत आहे अशी ही देवी.
देवी माता म्हटली की पहिले आठवतं ते दुर्गेचा रौद्र अवतार. शितळादेवी मात्र याच्या विरुद्ध आहे. खरंतर प्रत्येक देवीचं रुप हे स्त्रीजीवनाशी जोडलेलं आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दोन हात करणारी दुर्गा जशी आहे तशी कुटुंबासाठी प्रेम, आनंद आणि स्नेह जपणारी स्त्री तितकीच सात्विक आणि शांत आहे. शितळादेवी अशा स्त्रीस्वभावाचं रुप आहे.
माहिमच्या या देवीचं मंदिर अडीचशे ते तीनशे वर्ष जुनं आहे. १८९० ते १८९५ या काळात मुंबईच्या कोळी बांधवांनी उभारले आहे. हे मंदिर सुरुवातीला मुंबईच्या किनाऱ्यालगत होते, पण नंतर कोळी बांधवांनी ते माहीमच्या पश्चिम भागात हलवले. हे कोळी बांधवांचे कुलदैवत मानले जाते आणि आख्यायिकांनुसार राजा बिंबदेव यांनी १३ व्या शतकात केळवे येथून देवीला माहीम येथे आणलं असं सांगितलं जातं. ही देवी पांढरं वस्त्र परिधान करते. पांढऱ्या रंगाची साडी, चांदीचे पैजण, चांदीच्या बांगड्या, पुजेला पांढरी फुलं असं एकंदरीत देवीचं सोवळं असतं.
पांढरा रंग हा पावित्र्य, शांती आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. देवी शितळा ही मोठे आजार आणि रोगांचा नाश करणारी देवता असल्याने, तिच्या स्वरूपात पांढऱ्या रंगाचा वापर हा शुद्धतेचा संदेश देतो. माहिम भागातील कोळी बांधवांचा असा समज आहे ही शितळादेवीच्या दर्शनाला आलेल्या भक्ताचे आजार दूर होतात. पुर्वीच्या काळी लहान मुलांना कांजण्या, गोवर किंवा कावीळची बाधा झाली की, शितळादेवीच्या मंदिरात आणलं जात असे. असं म्हटलं जातं की, स्कंदपुराणानुसार, एका अग्नीकुंडातून शितळा देवीची निर्मिती झाली. शांतता आणि समृद्धीसाठी या देवीला ओळखलं जातं.
नवरात्रीत देवीचा मोठा उत्सव असतो. लाखो संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात मात्र एवढं असूनही कोणत्याही भक्ताला धक्काबुक्की आजपर्यंत झाली नाही. शितळादेवी शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक आहे. या देवीला भक्त कोळी समाजच नाही तर वाडवळ समाज, गौड-सरस्वत ब्राह्मण समाज देखील या देवीची मनोभावे पूजा करतात.