फोटो सौजन्य: pinterest
शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. ही नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर म्हटला जातो. या नवरात्रीत घट बसवले जातात. या घटाची पूजा त्याचं महत्व अनंन्यासाधारण आहे. हे घट म्हणजे नऊ धान्य मातीत पेरले जातात. नवरात्रीत नऊ धान्य पेरण्याची प्रथा अतिशय प्राचीन असून तिला बीजारोपण किंवा नवधान्य पेरणी असेही म्हणतात. नवरात्री हा शक्तीपूजेचा सण आहे.
या काळात मातेला निसर्गशक्तीचे रूप मानून अन्नसंपन्नतेची प्रार्थना केली जाते. पहिल्या दिवशी घटस्थापनेसोबत स्वच्छ मातीत नऊ प्रकारची धान्ये पेरली जातात. प्रदेशानुसार धान्ये थोडीफार बदलतात, परंतु गहू, ज्वारी, तांदूळ, मटकी, हरभरा, तूर, मूग, तीळ आणि चणा ही नऊ धान्ये सर्वसाधारणपणे वापरली जातात. ही नऊ धान्ये नऊ ग्रह आणि पंचमहाभूतांचे प्रतीक मानली जातात.
घटस्थापनेतील नारळ हा स्त्रीच्या गर्भाशयाचं आणि पृथ्वीतत्वाचं प्रतीक मानलं जातं. भारतीय हिंदू संस्कृतीनुसार स्त्री आणि जमीन यांना मातेचा दर्जा दिला जातो. जसं स्त्रीच्या उदरातून नवा जीव जन्माला येतो त्याचप्रमाणे तसंच धान्याचं बीज जमीनीच्या पोटात अंकुरतात. म्हणूनच घटस्थापना करताना धान्य देखील पेरली जातात.
याबाबतची माहिती किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ओमकार सावंत यांनी दिली आहे. नवरात्र म्हणजे फक्त स्त्रीशक्तीची पूजा नाही तर प्रजनन, सृजनशीलता आणि सुफलता याचं महत्व पटवून देतं. निसर्ग नवनिर्मिती आणि प्रसुतीचा सोहळा साजरा करतो. स्त्री आणि भूमी यांच्यात जीव जन्माला घालण्याचं सामर्थ्य आहे. या दोन्ही शक्ती आहेत म्हणून आपण जीवंत आहोत. या स्त्रितत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
धार्मिक दृष्टिकोनातून या पेरणीला विशेष महत्त्व आहे. नऊ दिवसांत बीज उगवण्याची प्रक्रिया म्हणजे देवीच्या शक्तीचा उत्सव मानला जातो. तसेच शेतीचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे याची जाणीव करून देणारी ही सुंदर परंपरा आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, घरात उगवलेली हिरवी रोपे ऑक्सिजन निर्माण करतात, घरातील हवेत ताजेपणा आणतात आणि निसर्गाशी आपले नाते दृढ करतात.अशा प्रकारे नवरात्रीतील नऊ धान्य पेरणी ही केवळ धार्मिक विधी नसून निसर्ग, शेती, पर्यावरण आणि सकारात्मक उर्जेचे एकत्रित शास्त्र आहे. ही पेरणी म्हणजे देवीला वंदन करण्याबरोबरच पृथ्वीच्या सुपीकतेचे आणि अन्नसंपन्नतेचे आभार मानण्याची सुंदर परंपरा आहे.