फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिन्याची सुरुवात शुक्रवार, 25 जुलैपासून होत आहे. तर त्याची समाप्ती शनिवार, 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. श्रावण महिना हा शिव पार्वतीच्या पूजा करण्यासाठी विशेष महिना मानला जातो. हा महिना खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये चार श्रावणी सोमवार येतात. यावेळी प्रत्येक शिवभक्त महादेवाच्या उपासनेसाठी भक्तीमध्ये मग्न होतात. नवरात्रीप्रमाणेच श्रावण महिना देखील खूप पवित्र मानला जातो. या महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. यावेळी भक्त उपवास करतात पण खाण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे नियमांचे पालन करणे गरजेचे असते. श्रावण महिन्यामध्ये ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात त्या करु नये, असे मानले जाते. श्रावण महिन्यात बरेच लोक मांसहार पदार्थ खात नाही त्यापासून पूर्ण दूर राहतात. श्रावण महिन्यात मांसाहार पदार्थांचे सेवन का केले जात नाही, जाणून घ्या
धार्मिक मान्यतेनुसार, कोणत्याही देवतेची उपासना करण्याच्या वेळी मांसाहार आणि मद्यपान करणे निषिद्ध मानले जाते. श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्याने या महिन्यामध्ये पवित्रता आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाते. दरम्यान, या महिन्यात मांसाहारी पदार्थ खाणे निषिद्ध मानले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे तुमच्यामध्ये राग, अज्ञान, आळस इत्यादी समस्या उद्भवू शकतात. मांस आणि मासे हे देखील तामसिक अन्न आहेत. अशी मान्यता आहे की, ज्या घरामध्ये पूजा केली जाते किंवा जे लोक उपवास करतात, तिथे अन्न शिजवले गेले तर पूजा करणाऱ्या व्यक्तीचाही इंद्रियांवरचा ताबा सुटतो. यामुळे पूजामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
तसेच जी व्यक्ती पूजा करत असते त्या व्यक्तीचे लक्ष पूजा आणि अध्यात्मापासून विचलित होऊ शकते. धार्मिक श्रद्धेनुसार, श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या करणे हे पाप मानले जाते. या महिन्यात सजीव प्राण्याची हत्या झाल्यास महादेव क्रोधित होऊ शकतात. जी व्यक्ती असे करेल ती व्यक्ती पापी ठरु शकते. तसेच तुमची पूजा कधीही यशस्वी होत नाही आणि महादेवांचा तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही, अशी श्रद्धा आहे.
श्रावण महिन्यामध्ये मांसाहार न करण्याबाबत काही वैज्ञानिक कारणे देखील सांगण्यात आलेली आहे. श्रावण महिना पावसाळ्यामध्ये येतो यावेळी अन्नपदार्थांमध्ये बुरशी आणि बॅक्टेरियाचा धोका खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत अन्न शिजवल्यानंतर किंवा स्वच्छ केल्यानंतर खाल्ले नाहीत तर तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे त्या अन्नामधून विषबाधा होण्याची देखील शक्यता असते. या ऋतूमध्ये मांस मासे लवकर खराब होणे किंवा कुजण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमकुवत होते. त्यामुळे अन्न लवकर आणि सहज पचवणे कठीण असते. त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार करु नये, असे वैज्ञानिकांचे कारण असू शकते.
त्यासोबतच पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये संसर्ग पसरण्याचा जास्त धोका असतो. मांसाहारी पदार्थांमध्ये बॅक्टेरिया, बुरशी, जंतू असल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे पचनसंस्थेसोबतच रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. त्यामुळे वारंवार आजारपण येण्याची शक्यता असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)