फोटो सौजन्य; Social Media
महाराष्ट्रात गुरु परंपरेचा इतिहास हा खूप मोठा आहे. आजही कित्येक जण गुरूंनी सांगितलेल्या अध्यात्माच्या मार्गाने चालत समृद्ध आयुष्याचा आनंद जगण्याचा प्रयत्न करत असतात. गुरु परंपरेत दत्त गुरू आणि त्यांच्या अवतारांची पूजा केली जाते. यात स्वामी समर्थांचा उल्लेख विशेष करावा लागेल.
आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन. या निमित्ताने देशभरातील भाविक स्वामींच्या अक्कलकोट नगरीत दाखल होत असतात. तसेच अनेक ठिकाणी स्वामींच्या मठात विविध कार्यक्रम आयोजिले जातात. स्वामींबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण क्वचित लोकांना स्वामी समर्थ आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यातील भेटीबद्दल ठाऊक असेल. चला याबद्दल जाणून घेऊया.
swami samarth prakat din: प्रकट दिनाच्या दिवशी अशी करा पूजा, स्वामी होतील प्रसन्न
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात न जाणो कित्येक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे वासुदेव बळवंत फडके. त्यांना सशस्त्र क्रांतीचे जनक असे देखील म्हंटले जाते. पण खूप कमी जणांना माहित आहे की ते दत्त उपासक देखील होते. त्यांची दत्त गुरूंवर विशेष श्रद्धा होती. तसेच त्यांनी सात हजार ओव्यांचा दत्तमहात्म्य नावाचा ग्रंथ देखील लिहिला होता.
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे स्वामी समर्थांचे मोठे भक्त होते. फडके स्वामींचे दर्शन घेण्यासाठी दोन ते तीन वेळा अक्कलकोटला गेले होते असे म्हंटले जाते. वासुदेव बळवंत फडके यांनी ठरवले होते की भिल्ल, रामोशी,आगरी आणि कोळी इत्यादी समाजातील लोकांना एकत्रित करून ब्रिटीश सरकारविरोधात बंड करण्याचे ठरवले. मात्र, हा बंड पुकारण्याअगोदर त्यांनी स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्याचे ठरवले.
नेहमीप्रमाणे वासुदेव बळवंत फडके अक्कलकोट नगरीत स्वामींचे दर्शन घेण्यासाठी पोहचले. यावेळी ते स्वामींना शरण गेले आणि आपल्या हातातील तलवार स्वामींसमोर ठेवली. खुद्द स्वामींच्या शुभ हाताने तलवार मिळावी आणि त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा ही त्यांची इच्छा होती.
dream science: नवरात्रीमध्ये स्वप्नात या गोष्टी दिसल्यास तुमच्यावर राहील देवीचा आशीर्वाद
वासुदेव बळवंत फडकेंची ही इच्छा स्वामींनी शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, “हम जानते हैं | यह नेक काम है |” त्यानंतर त्यांनी एका सेवेकऱ्याला समोर ठेवलेली तलवार झाडावर टांगून ठेवण्यास सांगितले.
स्वामी समर्थांनी फडके यांना सावध करत सांगितले, “अभी वक्त नहीं हैं |” म्हणजेच, जरी त्यांचे कार्य उचित असले तरी ही क्रांती यशस्वी होणार नाही. मात्र, फडके आपल्या संकल्पावर ठाम होते आणि मागे हटण्यास तयार नव्हते. शेवटी त्यांनी तलवार घेतली, स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि पुढील प्रवासाला निघून गेले.
नंतरच्या काळात त्यांची क्रांतीची लढाई अपयशी ठरली. वासुदेव बळवंत फडके यांना अटक झाली आणि अखेर शके १८०४, माघ शुद्ध एकादशी या दिवशी एडन येथील कारागृहात त्यांचे निधन झाले.