स्वराज्याच्या डोलारा संभाळणारा आणि रयतेला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारा हा राजाचं आजच्या दिवशी म्हणजे तब्बल साडेतीनशे वर्षापूर्वी महानिर्वाण झालं आणि रयत पोरकी झाली. राजाचा दानशूरपणा, राजाचा पराक्रम, राजाचं शौर्य आणि आभाळाइतकी रयतेवर असलेली अपार माया. ऐसा कनवाळूचा प्रजेसाठी सर्वस्व पणाला लावतो त्या राजावर जनता का जीव ओवाळणार नाही? मराठ्यांच्या धाडसाला, भोसले कुळाच्या शौर्यगाथेला साडेतीनशे वर्ष उलटून गेली तरी आजही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की उर भरून येतो. स्वराज्याच्या या थोरल्या धन्य़ाची जागा धाकल्या धन्यानी म्हणजे शंभूराजेंनी जीवावर उदार होऊन चालवली. राजेपणा मिरवला नाही तर शिवछत्रपतींचे विचार मनामनांत रुजवून रयतेप्रति असलेली कर्तव्य पार पाडली.
इतिहासात डोकावून पाहिलं तर दिलेरखानाच्या छावणीत शंभूराजे सामील झाले आणि त्यांनी स्वराज्याशी प्रतारणा केल्याचे अनेक आरोप लावले गेले होते. आजही या काहींच्या मते यात तथ्य़ आहे असं म्हटलं जातं. मात्र छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथात वा.सी. ब्रेंदे यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. शंभूराजे दिलेरखानाला जाऊन मिळणं हा शिवारायांचा गनिमीकावा होता. दिलेरखानाच्या छावणीतून सुटका झाल्यानंतर आणि त्या दरम्यानच्या काळातही या बापलेकात फूट पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र या पितापुत्राच्या प्रेमासमोर सारं गैरसमजाचं आणि कुटनितीचं वादळ क्षुल्लक होतं. दिलेरच्या छावणीतून बाहेर पडल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी या बाप लेकाची भेट पन्हाळ गडावर झाली. स्वराज्यासाठी मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या दोन्ही पराक्रमी राज्य़ांच्य़ा भेटीपुढे सह्याद्री देखील हळवा झाला. बापावर लेकाची अपार माया आणि लेकावर बापाची आभाळाइतकी असलेली सावली. स्वराज्याचे चंद्र आणि सूर्याच्या भेटीचा तो क्षण इतिहासात अमर आहे.
1679 च्या सुमारास, काही राजकारणातल्या घडामोडींमुळे आणि विशिष्ट गटांच्या कुटनितीमुळे संभाजी महाराजांना रायगड सोडून किल्ले पन्हाळ्यास जावे लागले. त्यावेळी त्यांच्यावर काही आरोप झाले होते, आणि काही इतिहासकारांच्या मते, त्यांच्या स्वराज्यातील काही सरदारांनी त्यांच्याविरोधात शिवाजी महाराजांची दिशाभूल केली होती.शिवाजी महाराजांनी ही परिस्थिती समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला आणि अखेर शंभुराजे आणि शिवाजी महाराज यांची शेवटची भेट पन्हाळगडावर झाली. राजकारणात या भेटीमुळे मोठी उलथापालथ झाली होती. ब्रिटीश, मुघल पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांनी या भेटीची भिती घेतली होती. या भेटीने स्वराज्याचे चंद्र सूर्य एकत्र येण्याची ही नांदी होती. त्याचबरोबर भोसले कुळासाठी देखील हा तितकाच भावनीक सोहळा होता.
राजकारणामुळे शिवरायआणि शंभूराजे या बापलेकांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. सोयराबाईंच्या मनात शंभूराजेंविषयी असलेल्या प्रेमाची जागा सत्तेच्या मोहाने आणि द्वेषाने घेतली होती. हा मोह इतका वाढीस गेला की शंभूराजेंचा सावत्रपणाची वागणूक मिळत गेली. याचकारणास्तव थोरल्या धन्यानी शंभूराजेंना पन्हाळ गडी पाठवले. बाप लेकाच्या या भेटीची बाबातचा इतिहास वाचताना सिनेमात पाहताना आजही प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं.13 जानेवारी 1680 रोजी ही भेट झाली पन्हाळ्य़ाच्या किल्यावर बापलेकाची भेट झाली खरी पण या आनंदाला या नजर लागली. आपल्या आबासाहेबांशी झालेली ही भेट शेवटची ठरेल असं शंभूबाळाला स्वप्नातंही वाटलं नव्हतं.
या भेटीचा आनंद मनात साठवून ठेवता तेच शिवसृष्टीच्या या सूर्याला ग्रहण लागलं. 3 एप्रिलला रयतेच्या या मायबापाने या जगाचा निरोप घेतला. जन्मदाता बाप कायमचा सोडून गेला आभाळाएवढं मायेचं छत्र हरपलं तरी सूडाने पेटलेल्या सोय़राबाईंनी य़ाची खबर देखील शंभूराजेंना लागू दिली नाही. लहानपणी आईच्या मायेला पोरका झालेल्या शंभूबाळाचं बापाचं छत्रही हरपलं. मात्र या सिंहाच्या छाव्याने डगमगून न जाता या स्वराज्याचा कारभार हाती आणि शिवविचारांचा वारसा जपत आजन्म स्वराज्य हितासाठी वाहिला.
धन्य ते शिवराय , धन्य ते शंभूराजे आणि धन्य ती शौर्यगाथा!..