'शून्यसावली दिवस’ (फोटो- टीम नवराष्ट्र)
नागरिकांनी घेतला दुर्मीळ खगोलीय घटनेचा रोमांचक अनुभव
अनेकांनी हा अनोखा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात केला कैद
सावलीशिवाय दिसणारी छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल
सुनयना सोनवणे /पुणे: पुणे शहरातील नागरिकांनी बुधवारी (दि. १३) ‘शून्यसावली दिवस’ या दुर्मीळ खगोलीय घटनेचा रोमांचक अनुभव घेतला. दुपारच्या सुमारास काही मिनिटांसाठी सूर्य डोक्यावर अगदी लंबवत (Science) आल्याने उभ्या वस्तूंच्या सावल्या अक्षरशः गायब झाल्या. उन्हाचा प्रखर तडाखा असूनही जमिनीवर सावली दिसत नसल्याने अनेकांनी हा अनोखा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
खगोलशास्त्रानुसार, सूर्य जेव्हा आकाशात सर्वाधिक उंचीवर पोहोचतो आणि त्याची किरणे पृथ्वीवर ९० अंशांच्या कोनात पडतात, तेव्हा ‘शून्य सावली दिवस’अनुभवास येतो. या वेळी सूर्य नेमका डोक्यावर असल्याने व्यक्ती किंवा वस्तूची सावली तिच्याच खाली लपते आणि काही क्षणांसाठी ती दिसेनाशी होते. पुण्याचा अक्षांश सुमारे १८.५ अंश उत्तर असल्याने बुधवारी सूर्य याच स्थितीत पोहोचला होता.
शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी रस्ते, मैदानं, गच्च्या आणि उद्यानांमध्ये उभे राहून या घटनेचा अनुभव घेतला. सोशल मीडियावरही खांब, बाटल्या आणि इतर वस्तू सावलीशिवाय दिसणारी छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. आयुका तसेच विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. पाइप, सिलिंडर आणि उभ्या वस्तूंच्या साहाय्याने सावली कशी नाहीशी होते, हे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
वैज्ञानिकांच्या मते, ही घटना पृथ्वीचा झुकाव, सूर्याभोवतीची परिक्रमा आणि खगोलीय गणित समजून घेण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. विज्ञानप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांसाठीही हा दिवस विशेष आकर्षणाचा ठरला. खुल्या मैदानांमध्ये पाइप, सिलिंडर आणि इतर वस्तू ठेवून सावली गायब होण्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. वैज्ञानिकांच्या मते, या घटनेचा उपयोग पृथ्वीचा व्यास आणि आकार समजून घेण्यासाठीही केला जातो.
‘दररोज दुपारी सावली मोठी किंवा छोटी दिसते; मात्र आज काही क्षणांसाठी ती पूर्णपणे गायब झाल्यासारखी वाटली. पायाखालीच सावली लपल्याचा अनुभव खूप वेगळा होता.’
-विजय कांबळे, विद्यार्थी






