नवरात्रीच्या निमित्ताने पुण्याची ग्रामदेवी श्री तांबडी जोगेश्वरी देवीची माहिती देणारा लेख (फोटो - टीम नवराष्ट्र)
प्रिती माने : प्रत्येक गावाला एक ग्रामदैवत आणि ग्रामदेवी असते. त्याचप्रमाणे पुण्याला देखील आहे. पुणे शहर दिवसेंदिवस वाढत असेल तरी पूर्वीच्या छोट्या गावाच्या खुणा आजही आपल्याला बघायला मिळतात. पुण्यातील महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक मंदिरापैकी एक म्हणजे तांबडी जोगेश्वरी देवी. तांबडी जोगेश्वरी देवी हीच पुण्याची ग्रामदेवी आहे. पूर्वी हे मंदिर गावाच्या वेशीवर होतं. आता मात्र ते अगदी रहदारीच्या आणि मध्यवर्ती भागामध्ये आले आहे. आप्पा बळवंत चौकाजवळ ही तांबडी जोगेश्वरी देवी असून ही देवी आपल्या गावाचे रक्षण करते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. देवीचा विविध रुपांमध्ये श्रृंगार केला जातो. तांबडी जोगेश्वरी हे ऐतिहासिक असून या मंदिरामध्ये पेशवे देखील दर्शनासाठी येत असत. 350 वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून त्याचे बांधकाम दगडी आहे. मंदिरामध्ये सभागृह आणि गर्भगृह आहे. सभागृहामध्ये सिंहाची मूर्ती असून गणराय आणि विठ्ठल रुक्मिणीची देखील मूर्ती आहे. त्याचबरोबर आवारामध्ये दगडी कारंजे देखील आहे. यामुळे मंदिराची शोभा आणखी वाढली आहे. तांबडी जोगेश्वरी देवीची मूर्ती स्वयंभू असल्याचे देखील म्हटले जाते. मंदिराच्या बाहेर दीपमाळ देखील आहे. मात्र वाढत्या गर्दीमुळे ती लवकर लक्षात येत नाही.
तांबडी जोगेश्वरी देवीची अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे. मूर्ती चतुर्भुज असून उभी राहिलेल्या स्वरुपामध्ये आहे. देवीच्या वरच्या उजव्या हातामध्ये डमरु तर वरच्या उजव्या हातामध्ये त्रिशुल आहे. खालच्या उजव्या हातामध्ये असुरचं शीर पकडलं आहे तर डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. देवीच्या जवळ कोणतेही वाहन नाही. मूर्ती प्रसन्न असून भाविकांची मोठी श्रद्धा ग्रामदेवी आहे. देवीला लग्नकार्य असो किंवा इतर शुभकार्याचे पहिले अवतान दिले जाते. पुण्यातील मानाच्या गणपतींमध्ये देखील तांबडी जोगेश्वरी गणपतीला मान आहे. ग्रामदेवी म्हणून हा मान असून गणरायाला देखील तांबडी जोगेश्वरी म्हटले जाते.
‘तां नमामी जगदधात्री योगिनी परयोगिनी’ असा महिमा योगेश्वरी देवीचा पुराणांमध्ये सांगितला जातो. देवीचा उल्लेख मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा आढळतो. योगेश्वरी माताचे दुसरे नाव म्हणजेच जोगेश्वरी आहे. पुण्यामध्ये जोगेश्वरी देवीची तीन मंदिरं आहे. त्यातील तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदेवी आहे. ही देवी थोडी तांबडी असल्यामुळे म्हणजे ती ताम्रवर्णी असल्यामुळे तिला तांबडी जोगेश्वरी म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर आसूर महिषासुराचे बारा सेनापती होते. त्यामध्ये ताम्रसुर नावाचा एक सेनापती होता. त्याचा वध देवीने केल्यामुळे देवीला ताम्र जोगेश्वरी म्हणू लागले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन तांबडी जोगेश्वरी म्हणू लागल्याची आख्यायिका सांगितली जाते. तांबडी जोगेश्वरी देवी ग्रामदेवी म्हणून प्रसिद्ध असून दसऱ्याला देवीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.