वृक्षारोपण पक्ष्यांच्या विविधतेसाठी ठरतेय परिणामकारक
15 ठिकाणी केलेल्या अभ्यासानंतर झाले स्पष्ट
गवताळ प्रदेशांच्या संवर्धनाबाबत नव्याने विचार करण्याची गरज
सुनयना सोनवणे/पुणे: महाराष्ट्रातील सव्हाना (गवताळ प्रदेश) भागात मोठ्या प्रमाणावर केले जाणारे वृक्षारोपण हे पक्ष्यांच्या विविधतेसाठी संमिश्र परिणाम करणारे ठरत असल्याचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील (Navarashtra Special) पुणे आणि सातारा जिल्ह्यातील एकूण १५ ठिकाणांवर केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे. ‘कंझर्व्हेशन सायन्स अँड प्रॅक्टिस’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामुळे गवताळ प्रदेशांच्या संवर्धनाबाबत नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सव्हाना सायन्स फाउंडेशन, फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व पर्यावरण विज्ञान विभाग, सिम्बायोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी तसेच मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी (यूएसए) येथील सिद्धांत म्हेत्रे, प्रभव बनारा, यश गायकवाड, आर्यन देओरे, आविष्कार मुंजे आणि आशिष नेरलेकर या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.
अभ्यासानुसार, नैसर्गिक गवताळ प्रदेशांचे वृक्षलागवडीत रूपांतर केल्यास पक्ष्यांची एकूण संख्या किंवा प्रजातींची संख्या फारशी बदलत नाही. मात्र, पक्षीसमूहाची रचना मोठ्या प्रमाणावर बदलते. विशेषतः गवताळ प्रदेशाशी निगडित ‘सव्हाना-विशेष’ पक्ष्यांची संख्या घटते, तर जंगलाशी संबंधित ‘वुडलँड-विशेष’ आणि मधुरसावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते.
संशोधकांनी ४५९ ते १००७ मिमी पर्जन्यमान असलेल्या भागांचा अभ्यास केला. त्यातून असे दिसून आले की, मध्यम पर्जन्यमानाच्या (५६०-९२० मिमी) प्रदेशात वृक्षारोपणामुळे पक्षीविविधता सर्वाधिक घटते. याउलट, अतिशय कोरड्या किंवा अतिशय ओल्या भागांत वृक्षलागवड काही प्रमाणात ‘पूरक अधिवास’ म्हणून कार्य करू शकते.
विशेष म्हणजे, गिरिपुष्प या सारख्या परदेशी वृक्षांच्या लागवडीमुळे सूर्यपक्ष्यांसारख्या मधभक्षी पक्ष्यांची संख्या वाढल्याचेही आढळले आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे गवताळ प्रदेशातील मूळ जैवविविधतेवर परिणाम होऊन परिसंस्थेचे स्वरूप बदलत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
मुख्य निष्कर्ष
– एकूण पक्षीसंख्या आणि प्रजाती विविधतेत लक्षणीय बदल नाही.
– मध्यम पर्जन्यमान पट्ट्यात वृक्षारोपणामुळे विविधता घटते.
– सव्हाना-विशेष पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी.
– वुडलँड-विशेष व मधभक्षी पक्ष्यांची संख्या वाढ.
– पक्षीसमूहाची रचना पूर्णपणे बदलते.
ऐतिहासिक पार्श्वभूमीही कारणीभूत
भारतातील गवताळ प्रदेशांना पूर्वी ‘उजाड जमीन’ म्हणून चुकीची वागणूक देण्यात आली. औपनिवेशिक काळात लाकूड उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व नंतर वृक्षलागवड करण्यात आली. स्वातंत्र्यानंतरही उत्पादनवाढ, ग्रामीण विकास आणि पर्यावरणीय पुनरुज्जीवनाच्या नावाखाली हीच धोरणे पुढे चालू राहिली. या काळात गिरिपुष्प सारख्या परदेशी प्रजातींची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. १९१६ साली श्रीलंकेतून भारतात आलेली ही प्रजाती सुरुवातीला शोभेच्या झाडासाठी वापरली जात होती; मात्र नंतर ती कृषिवनशेती आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षलागवडीचा भाग बनली. पश्चिम महाराष्ट्रात तिचा प्रसार लक्षणीयरीत्या वाढला आहे.
Pune शहरात 57 लाख झाडांची नोंद; तरी सावली ‘शोभेची’च! हवा शुद्ध करणाऱ्या देशी….
संवर्धनासाठी दिशा
संशोधकांच्या मते, गवताळ प्रदेशांचे संवर्धन करताना एकतर्फी वृक्षलागवडीऐवजी संतुलित आणि स्थानिक परिस्थितीनुसार धोरणे आवश्यक आहेत.
– नैसर्गिक सव्हाना प्रदेशात अनियंत्रित वृक्षारोपण टाळणे गरजेचे
– विद्यमान वृक्षलागवडीचे सूक्ष्म व्यवस्थापन करणे आवश्यक
– ‘मिश्र अधिवास’निर्माण करणे अधिक उपयुक्त
“गवताळ प्रदेश पृथ्वीवरील सुमारे २०% भूभाग व्यापतात आणि ते जैवविविधतेचे मोठे केंद्र आहेत. तरीही, वनसंवर्धनाच्या तुलनेत त्यांना कमी महत्त्व दिले जाते. कार्बन संकटावर उपाय म्हणून वृक्षलागवडीला प्रोत्साहन देताना गवताळ परिसंस्थांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.”
— सिद्धांत म्हेत्रे, संशोधक






