फोटो सौजन्य: गुगल
आई आणि तिच्या बाळाचं नातं तिचं बाळ जन्माला येण्याआधीच घट्ट झालेलं असतं. असं म्हणतात की नऊ महिने जसं बाळ आईच्या पोटात आकार घेतं तसंच त्या नऊ महिन्यात स्त्रीमध्येसुद्धा मातृत्व झिरपत जातं. आई जशी तिच्या बाळासाठी हळवी असते तशीच ती खमकीसुद्धा असते. अशीच एक खमकी आई म्हणजे अनुराधा गोरे.
अनुराधा गोरे यांना भारताची वीरमाता म्हणण्याचं कारणही तितकंच मोठं आहे.विनायक विष्णू गोरे २६ सप्टेंबर, इ.स. १९९५ कुपवाडा मध्ये वयाच्या २६व्या वर्षी कुपवाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात शहिद झाले. एकुलत्या एक मुलाला आलेलं वीरमरण या माऊलीने मोठ्या धिटाईने स्विकारलं. एवढ्या मोठ्या आव्हानाला अनुराधा गोरे खचल्या नाही. देशाच्या सुरक्षेसाठी देशप्रेमासाठी जीवावर उदार होण्याची धमक दाखवणारे असंख्य विनायक त्यांनी उभे केले. कॅप्टन विनायक यांच्या मृत्यूनंतर अनुराधा गोरे यांनी शाळांशाळातून आणि मंडळांमंडळातून व्याख्याने देऊन तरुणांना भारतीय सैन्याची, सैनिकांची आणि ते करीत असलेल्या कामाची माहिती देणारी व्याख्याने देणे आणि वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिणे सुरू केले. अनुराधा गोरे यांची बहुतेक पुस्तकं सैन्याच्या शौर्य आणि पराक्रम यासंबंधी आहेत. जानेवारी २०१७ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष देखील होत्या.
शिवाजी जन्मावा पण आपल्या नाही दुसऱ्याच्या घरात अशी एक म्हण आहे. मात्र या देशात असेही काही पालक आहेत अशा ही काही माता आहेत ज्यांनी देशासाठी आपल्या पोटच्या मुलांचा त्याग केला. सध्या भारत पाकिस्तान युद्धामुळे देशातल्या नागरिकांमध्ये असुरक्षितेची जाणिव आहे. तरुण वर्गामध्येही याबाबात भिती आहे.मात्र असं असताना आपला मुलगा सैन्यात आहे आणि तो देशाचं संरक्षण करतोय याची जाणिव असणाऱ्या वीरमाता सर्व भारतीयांसाठी मोठा आदर्श आहेत.
सीमेवर जाऊन बंदूक हातात घेता येत नसली म्हणून काय झालं या वीर मातेने लिखाण हेच शस्त्र आणि हीच देशसेवा असं म्हणून तरुणांनी सैन्यात जाण्यासाठी प्रेरित करण्याचं व्रत हाती घेतलं. वीरमाता अनुराधा गोरे यांनी भारतीय सैन्यावर अनेक लेख आणि पुस्तकंही लिहीली आहे. शिवबाने स्वराज्याच्या डोलारा उभा केला कारण पाठीशी जिजाऊ आईसाहेब होत्या.तसंच देशासाठी प्राण पणाला लाववणाऱ्या प्रत्येक वीरपुत्राला पाठीशी जिजाऊंसारथी वीरमाता असते. आजच्या या मातृदिनाच्या निमित्ताने देशासाठी पोटच्या मुलांमा सैन्यात पाठवणाऱ्या या तमाम वीरमातांना नवराष्ट्रचा मानाचा सलाम!