National Science Day: काय आहे 'रमन इफेक्ट'? यामुळे भारताला मिळाले पहिले नोबेल(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचा उद्देश समाजात विज्ञानाच्या फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि विज्ञानाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा आहे. हा दिवस डॉ. सी. व्ही रमन यांच्या विज्ञानातील उत्तम कामगिरीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1920 रोजी रोजी डॉ. चंद्रशेखर वेंकट रमन यांनी “रमन इफेक्ट” या क्रांतिकारी शोधाची जगाला माहिती दिली.
डॉ. सी. व्ही. रमन यांच्या शोधासाठी 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा नोबेल पुरस्कार भारताच्या विज्ञानाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला. हा दिवस राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने साजरा केला जातो.
काय आहे ‘रमन इफेक्ट’?
डॉ. रमन यांनी सूर्यकिरणांच्या पारदर्शक वस्तूंमधून होणाऱ्या विचलनाचा अभ्यास केला होता. या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की सूर्यकिरण जेव्हा पारदर्शक माध्यमातून जातात, तेव्हा प्रकाशाचा एक भाग बिखरतो आणि त्याच्या रंगांमध्ये बदल होतो. यामुळे पाण्याचा रंग निळा दिसतो. याच प्रक्रियेला “रमन इफेक्ट” म्हटले जाते.
रमन स्पेक्ट्रोस्कोपीची उपयोगिता
रमन इफेक्टच्या आधारे विकसित झालेली रमन स्पेक्ट्रोस्कोपी आज अनेक क्षेत्रांमध्ये भारताला उपयोगी पडत आहे. चंद्रयान मोहिमेदरम्यान चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा मिळवण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला होता. तसेच फॉरेन्सिक सायन्स, औषधनिर्मिती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जैवशास्त्र यांसारख्या क्षेत्रांमध्येही या संशोधनाचा मोठा उपयोग होतो.
डॉ. सी.व्ही. रमन यांचा प्रवास
डॉ. रमन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांचे वडील गणित व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. यामुळे लहानपणापासूनच रमन यांना विज्ञानाची अत्यंत आवड होती. 1921 मध्ये ब्रिटनला प्रवास करताना त्यांनी समुद्राच्या निळ्या रंगाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. या प्रवासानेच त्यांना “रमन इफेक्ट” शोधण्याची प्रेरणा दिली.
त्यानंतर 1917 मध्ये डॉ. सी. व्ही. रमन यांनी सरकारी नोकरी सोडून कोलकाता विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम सुरू केले आणि “इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स” (IACS) येथे मानद शास्त्रज्ञ म्हणून संशोधनाला सुरुवात केली. त्यांचे योगदान विज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले. त्यांच्या कार्यामुळे आजही त्यांना संपूर्ण जगभरात आदराचे स्थान दिले जाते.
राष्ट्रीय विज्ञान दिनाची सुरुवात
1986 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 28 फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. आजही या दिवशी विज्ञानातील प्रगती व संशोधन साजरे केले जाते. रमन इफेक्ट हा केवळ एक वैज्ञानिक शोध नसून, भारतीय संशोधनाची जगातील ओळख आहे.
आजच्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रयोगशाळा, अकादमी, शाळा, महाविद्यालये इत्यादी सर्व विज्ञान संस्थांमध्ये वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी विज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना राष्ट्रीय आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित केले जाते आणि विज्ञानाची लोकप्रियता वाढवण्यासाठी विशेष पुरस्कार देखील दिले जातात.
काय आहे यंदाची थीम?
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही राष्ट्रीय विज्ञान दिनाची एक अनोखी थीम ठेवण्यात आली आहे. यंदा 2025 ची भारतातील राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम “विज्ञानावरील जनतेचा विश्वास वाढवणे” ही आहे.