बाराशे नळधारकांना मनपा बजावणार 'वॉरंट', पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित
शहरात सुमारे अडीच लाखाहून अधिक नळ धारक असून, त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रूपयांची पाणीपट्टी थकली आहे. दरवर्षी महापालिकेकडून नळधारकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते. परंतु मोजक्याच लोकांकडून त्याला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे दरवर्षी थकबाकीची रक्कम वाढत जात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नळ धारकांना मिटर बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नळपट्टीबरोबरच घरपट्टी थकीत असलेल्या शहरातील सहाशे मिळकतधारकांनाही पहिल्या टप्यात नोटीसा बजावण्यात येत आहेत. यदा कर विभागाला दिलेल्या उद्दिष्टापैकी २१२ कोटी रूपये आतापर्यंत वसुल झाले आहेत. येत्या दिड महिन्यात सुमारे ४८ कोटी रूपये वसुल होणे अपेक्षित आहे. त्यासाठी थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आयुक्तांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
नळपट्टीचे देयके वेळेत मिळत नसल्याची सबब पुढे करून थकबाकी भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने चार दिवसांपुर्वीच महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी विभागीय अधिकारी, कर उपायुक्तांची बैठक घेवून त्यात घरपट्टी वसुलीचा आढावा घेवून थकबाकीदारांवर कारवाई करून सक्तीच्या वसुलीसाठी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्याच अनुषंगाने प्रत्येक विभागातील दोनशे
याप्रमाणे बाराशे थकबाकीदार नळधारकांच्या याद्या करून त्यांना वसुलीसाठी ‘वॉरंट’ बजावण्याच्या सुचना केल्या आहेत. या शिवाय प्रत्येक विभागातील २५ या प्रमाणे दिडशे नळ कनेक्शन कट करून वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सांगितले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दिड महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने तत्पुर्वी थकीत ७५ कोटीची वसुली करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे.






