आयसर पुणेच्या संशोधनातून ‘ऑटोफॅजी’ची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट(फोटो-सोशल मीडिया)
सोनाजी गाढवे/पुणे: वनस्पती जखम झाल्यानंतरही स्वतःची दुरुस्ती करून पुन्हा नव्याने वाढ कशा करतात, यामागील जैविक रहस्य उलगडणारे महत्त्वाचे संशोधन आयसर येथील शास्त्रज्ञांनी केले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, यूएसए (पीएनएएस) या शोधपत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
आयसर पुणे येथील प्राध्यापक कालिका प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटाने वनस्पतींमधील ‘ऑटोफॅजी’ (स्वभक्षण) या जैविक प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. ऑटोफॅजी ही पेशींमधील खराब झालेले घटक काढून टाकणारी एक प्रकारची सफाई यंत्रणा असून, जखम झाल्यानंतर वनस्पतींमध्ये होणाऱ्या ताणाचे नियंत्रण आणि पुनर्जननाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात तिची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
वनस्पती कापल्यानंतर किंवा जखमी झाल्यानंतर पेशींमध्ये ‘रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज (आरओएस)’ या रेणूंची पातळी झपाट्याने वाढते. ही पातळी जास्त असल्यास पेशींना हानी पोहोचू शकते. मात्र, संशोधकांनी असे आढळून आणले की ऑटोफॅजी ही प्रक्रिया आरओएस चे प्रमाण योग्य मर्यादेत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे पेशींवरील ताण कमी होतो आणि पुनर्जननासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण होते.
या अभ्यासात असेही दिसून आले की पानांच्या कापलेल्या भागातून पुन्हा मुळे फुटण्यासाठी ऑटोफॅजी सक्रिय होणे आवश्यक असते. विशेषतः एटीजी८एफएफ आणि एटीजी८एफएच या ऑटोफॅजीशी संबंधित जनुकांच्या आयसोफॉर्म्स मुळांच्या पुनर्जननामध्ये निर्णायक भूमिका बजावतात. पुढील प्रयोगांमधून असे स्पष्ट झाले की प्लेथोरा (पीएलटी) या वनस्पती-विशिष्ट जनुक समूहातील पीएलटी७ हा घटक एटीजी८एफएफ चे, तर पीएलटी३ हा घटक एटीजी८एफएच चे नियंत्रण करतो.
वनस्पतीला जखम झाल्यानंतर आरओएस हे सुरुवातीचे संकेतक म्हणून काम करतात आणि त्यानंतर ऑटोफॅजी सक्रिय होते. ही यंत्रणा प्राणी आणि वनस्पती दोघांमध्ये आढळते; मात्र वनस्पतींमध्ये पुनर्जननाला योग्य दिशा देण्यासाठी प्लेथोरा प्रथिनांचा वापर होतो, हे या संशोधनाचे वैशिष्ट्य होते असे प्रा. कालिका प्रसाद यांनी सांगितले.
या संशोधनामुळे वनस्पतींच्या पुनर्जनन प्रक्रियेबाबत नव्या नियामक उप-प्रणालीचा उलगडा झाला असून, भविष्यात शेती, ऊतक संवर्धन (टिश्यू कल्चर) आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात याचे महत्त्वपूर्ण उपयोग होऊ शकतात, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
आयसर पुणे येथे पार पडलेल्या या संशोधनाला भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी) आणि अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशन (एएनआरएफ) यांचे आर्थिक पाठबळ लाभले. हे संशोधन प्रा. कालिका प्रसाद यांच्या गटातील पीएचडी विद्यार्थिनी आकांक्षा गांगुली यांच्या नेतृत्वाखाली, पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आभा हुमनाबादकर आणि कोमल गौतम यांच्या सहकार्याने पूर्ण झाले. तसेच नेदरलँड्स, चीन आणि जर्मनी येथील संशोधकांनी आवश्यक संशोधन साहित्य आणि साधने उपलब्ध करून दिली. त्यामुळे रहस्य उलगडले.
हेही वाचा : ICC चे फटकारे तरीही पाकिस्तान बधला नाही! PCB प्रमुखाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘सरकारच्या निर्देशांचे’
“वनस्पतींमध्ये शाकीय प्रजननाद्वारे एका छोट्या कलमातून संपूर्ण नवीन वनस्पती विकसित होऊ शकते, हे आपल्याला माहीत आहे. मात्र कापल्यानंतर येणारा ताण असूनही ही प्रक्रिया कशी घडते, हा प्रश्न आम्हाला सतावत होता. या अभ्यासातून आम्ही दाखवून दिले की आरओएस–ऑटोफॅजी–प्लेथोरा यांची एक समन्वित यंत्रणा वनस्पतींना पुनर्जननासाठी सक्षम बनवते.” -प्रा. कालिका प्रसाद






