संत तुकाराम मुस्लीम शिष्य अनगडबाबा शाह दर्गा येथे असतो पालखीचा पहिला विसावा (फोटो - सोशल मीडिया)
प्रिती माने : संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले आहेत. वैष्णवांचा मेळा असलेल्या या वारीमध्ये आनंद आहे, उत्साह आहे. भक्तीचा सोहळा आहे तर पांडुरंगाप्रती प्रीती आहे. वारी हा केवळ एक सोहळा नाही तर ही एक उपासना आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूनगरीतून प्रस्थान झाले. आजीवन भक्तीमार्गाची कास धरणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम हा विशेष आहे. अनगडशाह बाबा यांच्या दर्ग्यामध्ये असणारा मुक्काम पालखी सोहळ्यातील सौहार्द आणि समतेचे प्रतिक ठरला आहे.
महाराष्ट्रातील सर्व संतांनी आपल्या अभंगवाणीतून समता, बंधूता व नीतिमत्ता याची शिकवण दिली आहे. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या आचरणामध्ये देखील समभाव दाखवला आहे. समाजातील जातीवर्णाचा व उच निचतेचा मोठा फटका संत तुकाराम महाराज यांना बसला. अंधश्रद्धा व एकाधिकारशाहीमुळे आपली सिद्धता सिद्ध करायला तुकोबारायांना अनेकदा दिव्य परीक्षा द्याव्या लागल्या. कुचेष्ठा आणि अपमान सहन करत तुकोबारायांना साहित्यनिर्मिती केली. त्यामुळे संत तुकाराम महाराज यांच्या गाथेमध्ये आणि आचरणामध्ये भेदभावाचा लवलेशही दिसून आला नाही.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।
अशी स्पष्टोक्ती असलेल्या संत तुकाराम महाराज यांनी समतेचा झेंडा कायम मिरवला आणि राखला आहे. याचा प्रत्यय म्हणजे आजही संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा पहिला विसावा हजरत अनगडशाह बाबा शाह दर्ग्यामध्ये होतो. तुकोबारायांचे परम मित्र असलेले अनगडशाह बाबा यांचा दर्गा देहूमध्येच आहे. देहूनगरीतून बाहेर पडल्यानंतर अवघ्या दोन किलोमीटरवर हा दर्गा आहे. पालखी ईनामदारांच्या वाड्यातून निघाल्यानंतर या दर्ग्यामध्ये विसावते. हिंदू संतांच्या पालखीचा मुस्लीम दर्ग्यामधील हा विसावा विशेष आहे.
तुकाराम महाराज यांची किर्ती ऐकून अनगडशाह बाबा देहूनगरीत आले. तुकोबारायांच्या निस्सीम भक्तीने आणि ओघवत्या वाणीने त्यांनी देहूमध्येच राहण्याचे ठरवले. तुकोबाराय आणि अनगडशाह बाबा यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यांच्या मैत्रीच्या नात्याला आध्यात्मिक किनार होती, मात्र धर्मभेदाचा लवलेशही नव्हता. त्यांचे भेटण्याचे ठिकाण म्हणजे हेच देहू जवळील हे पालखी विसावास्थान. आज आपल्या मैत्रीची साक्ष देण्यासाठी संत तुकाराम महाराज यांची पालखी पहिला विसावा हजरत अनगडशाह बाबा शाह दर्ग्यामध्ये घेते. संत तुकाराम महाराज यांचा पहिला विसावा असलेला हा दर्गा हिंदू मुस्लीम ऐक्याचा पुरावा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूतील मंदिरातून प्रस्थान करते. त्यानंतर देहूतील इनामदार वाड्यामध्ये पालखीचा पहिला मुक्काम असतो. दुसऱ्या दिवशी पालखी मार्गस्थ होते. तुकोबारायांच्या पालखीचा पहिला विसावा हा अंधेरीबाग येथील हजरत अनगडशाह बाबा शाह दर्गामध्ये होतो. यावेळी दर्ग्यासमोरील मेघडंबरीत तुकाराम महाराजांची पालखी ठेवण्यात येते. हे मेघडंबरी अभंग-आरतीस्थान म्हणून ओळखले जाते. अनगडशाह बाबांच्या समाधीसमोर तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर तिथे अभंग गायले जातात. तसेच दर्ग्यासह पालखीची पुजाही केली जाते. सगळे वारकरी पंढरपुरकडे मार्गस्थ होताना अनगडशाह बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला निघतात. अगदी भक्तीभावाने प्रत्येक वारकरी याठिकाणी नमस्कार करतो.
मागील साडे तीनशेहून अधिक वर्षे ही प्रथा अवरित सुरु आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वैशिष्ट्य असलेला हा दर्गातील विसावा हिंदू मुस्लिम एकेतेचे दर्शन घडवणारा आहे. वारकरी सांप्रदाय सर्वसमावेशक असल्याची जाणीव करुन देणारा आहे. वैश्विक प्रेमाची आणि समतेची शिकवण देणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या आचरणाचे हे प्रतिक आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनगडशाह बाबा शाह यांच्या दर्गाला विशेष महत्त्व आहे. वारकऱ्यांसाठी फक्त परमेश्वर भक्ती हे प्रमाण आहे. त्यामुळे इतर भेदभाव निर्माण करणाऱ्या बाबींना वारकरी सांप्रदायामध्ये स्थान नाही. याच कारणामुळे वारकरी सांप्रदाय अधिक लोकप्रिय आहे. वारकरी सांप्रदाय जनमान्य करण्यामध्ये यातील शिकवणी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.