World Blood Donor Day : १४ जून हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रक्तदाता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे रक्तदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आणि स्वयंप्रेरणेने रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान करणे. आजही अनेक रुग्णदवाखान्यांमध्ये, अपघातग्रस्त रुग्णांसाठी किंवा गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी रक्ताची तातडीने गरज असते. अशा वेळी, निःस्वार्थ रक्तदात्यांचे योगदान अनमोल ठरते.
जागतिक रक्तदाता दिन का साजरा केला जातो?
या दिवसाचे विशेष महत्त्व यामध्ये आहे की, रक्तदात्यांच्या योगदानामुळे लाखो रुग्णांचे प्राण वाचवले जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, दरवर्षी जगभरात सुमारे ११८.५४ दशलक्ष (११ कोटी ८५ लाख) रक्तदाने केली जातात. त्यापैकी, ४०% रक्त उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये गोळा केले जाते, जिथे जगाच्या फक्त १६% लोकसंख्या राहते. ही असमानता समोर ठेवून, अधिकाधिक देशांमध्ये रक्तदानविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आता अणुकरार करा, नाहीतर विनाश अटळ… ’इस्रायल-इराण युद्धात पुन्हा डोनाल्ड ट्रम्पची मध्यस्ती
इतिहास: १४ जून निवडण्यामागचे कारण
१४ जून हा दिवस डॉ. कार्ल लँडस्टाइनर यांच्या जन्मदिनानिमित्त निवडण्यात आला आहे. त्यांनीच रक्तगट प्रणाली (A, B, AB, O) शोधून काढली. त्यांच्या या शोधामुळे रक्त संक्रमण शक्य झाले आणि वैद्यकीय क्षेत्रात एक क्रांती झाली. त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. त्यामुळे जागतिक रक्तदाता दिन त्यांना समर्पित मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने २००४ साली प्रथमच जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला, आणि तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
२०२५ ची थीम: ‘रक्त द्या, आशा द्या’
या वर्षीची जागतिक रक्तदाता दिनाची थीम आहे. ‘रक्त द्या, आशा द्या’ (Give blood, give hope). ही थीम एका रक्तदात्याच्या कृतीचा एखाद्याच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम होतो, यावर प्रकाश टाकते. रक्तदान हा एक सामाजिक व मानवी कर्तव्यभावना जोपासणारा महान उपक्रम असून, या कृतीतून प्रेम, सेवा आणि आशेचा संदेश दिला जातो.
भारतामध्येही रक्तदानाबाबत वाढती जागरूकता
भारतामध्येही विविध संस्था आणि यंत्रणा रक्तदान जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहेत. पीआयबीच्या अहवालानुसार, २४ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय लष्कराने ७५ व्या सैन्य दिनानिमित्त दक्षिण भारतातील १० राज्यांमध्ये भव्य रक्तदान मोहीम राबवली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा या अभियानात समावेश होता. यामध्ये हजारो लष्करी जवान, अधिकारी व नागरिकांनी सहभाग घेतला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran war : खामेनेईंच्या इराणला एका रात्रीत हादरवले; इस्रायलचे RAAM, SOUFA और ADIR ठरले बाहुबली
रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा
रक्तदान ही एक अशी कृती आहे जी कोणालाही नुकसान न करता दुसऱ्याचे जीवन वाचवू शकते. रक्ताची गरज कोणालाही, कधीही भासू शकते. म्हणूनच, जागतिक रक्तदाता दिन हे केवळ औपचारिकतेपुरते न मानता स्वतःहून पुढाकार घेऊन रक्तदान करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. आजच्या दिवशी, आपण सर्वांनी ‘रक्त द्या, आशा द्या’ या थीमला अनुसरून कमीत कमी एकदा तरी रक्तदान करण्याचा संकल्प केला पाहिजे. हे एक पाऊल कुणाचातरी आयुष्याच्या लढाईत विजयाचे कारण ठरू शकते!