‘आता अणुकरार करा, नाहीतर विनाश अटळ... ’इस्रायल-इराण युद्धात पुन्हा डोनाल्ड ट्रम्पची मध्यस्ती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump on Israel Iran war : इस्रायलने इराणच्या अणु व लष्करी तळांवर जोरदार हवाई हल्ला केल्यानंतर संपूर्ण पश्चिम आशिया अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट अणुकरारासाठी धमकी देत सांगितले आहे की, “आता तरी करार करा, अन्यथा आणखी विनाश अटळ आहे. इस्रायलकडे अत्यंत धोकादायक शस्त्रसाठा आहे.”
शुक्रवारी इस्रायलने इराणमधील अणु आणि लष्करी तळांवर अचूक लक्ष्य करत हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसेन सलामी आणि सशस्त्र दल प्रमुख जनरल मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलला “कठोर शिक्षा” देण्याची घोषणा केली आहे.
हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एका तीव्र प्रतिक्रियेत इराणला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले, “इराणमध्ये कराराला विरोध करणारे सर्व आता मारले गेले आहेत. अजूनही वेळ आहे, आता करार करा अन्यथा जे होईल ते खूप भयंकर असेल.” ट्रम्प म्हणाले, “मी इराणला अनेक संधी दिल्या. कठोर शब्दात सांगितले की करार करा. पण ते पुन्हा पुन्हा अपयशी ठरले. मी आधीच स्पष्ट केलं होतं की अमेरिकेकडे जगातील सर्वोत्तम आणि घातक लष्करी साधनसामग्री आहे आणि इस्रायलकडे त्याचा मोठा साठा आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘F* you all bomb…’ या धमकीने खळबळ! फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या Air Indiaच्या विमानात सापडली बॉम्बची नोट
इराणमधील कट्टरपंथ्यांना इशारा देताना ट्रम्प म्हणाले, “जे बोलत होते, ते आता मेले आहेत. पुढे जे काही घडणार आहे, ते यापेक्षाही अधिक विनाशकारी असेल. यापूर्वीच खूप मृत्यू आणि हानी झाली आहे, पण अजूनही नरसंहार थांबवण्यासाठी वेळ शिल्लक आहे.” ट्रम्प यांनी हे देखील सूचित केले की, भविष्यात आणखी नियोजित हल्ले होणार आहेत, जे अत्यंत घातक आणि निर्णायक असतील.
ट्रम्प यांच्या मते, “इराणने त्वरित करार करायला हवा. अन्यथा एकेकाळी ‘इराणी साम्राज्य’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्र पूर्णपणे नष्ट होईल. मृत्यू आणि विनाश नको, फक्त करार करा. खूप उशीर होण्यापूर्वी.” ट्रम्प यांनी शेवटी नम्र शब्दांत लिहिलं, “देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.”
इस्रायली हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणी परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली असून या हल्ल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रशियाने देखील दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध करत इस्रायलकडून झालेला इराणवरील हल्ला हा संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचा स्पष्ट उल्लंघन असल्याचे सांगितले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलचा थेट इराणच्या छाताडावर वार; ‘Iranian octopus’चे सैन्य तयार, ‘Gulf countries’ युद्धाच्या छायेत
इस्रायल-इराणमधील तणाव आता पूर्णतः उघडपणे युद्धाच्या दिशेने सरकत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा आणि इस्रायली हल्ल्यांमुळे पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने बदला घेण्याची घोषणा केली असून, आगामी काही दिवसांमध्ये या संघर्षाला जागतिक पातळीवर वेगळं वळण मिळू शकतं. एकूणच, इराणकडून होणारा संभाव्य प्रतिहल्ला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या भूमिकेमुळे पुढील घडामोडी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.