World Day Against Child Labor : बालपण हिरावून घेणाऱ्या बालकामगाराविरोधात जागतिक ऐक्य म्हणजे 'जागतिक बालकामगार विरोधी दिन' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Day Against Child Labor : आजच्या गतिमान युगातही जगभरात लाखो बालक आपल्या निष्पाप बालपणाच्या काळात शाळा, खेळ, शिक्षण याऐवजी कष्टकरी जीवन जगत आहेत. त्यांच्या या वेदनादायी वास्तवाकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी १२ जून रोजी ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक औपचारिकता नसून, एक सामाजिक साद आहे – जी आपल्या प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते की “मुलांचे काम नाही, तर शिक्षण हवे!”
२००२ साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (International Labour Organization – ILO) ने बालकामगाराच्या प्रश्नावर जागतिक पातळीवर जनजागृती निर्माण करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी १२ जूनला सर्व देश, संस्था आणि समाजिक कार्यकर्ते बालकामगारविरोधी अभियानात सक्रिय सहभाग घेतात. या निमित्ताने जगभरात अनेक देशांमध्ये चर्चासत्रे, रॅली, जनजागृती मोहीम, शाळांमध्ये उपक्रम आणि माध्यमांतून व्यापक जनप्रबोधन घडवले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सिंधू जल करारानंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी; हिंदू कुश हिमालयातील 75% हिमनद्या धोक्यात
बालकामगार म्हणजे १८ वर्षांखालील मुलांना शिक्षणाऐवजी जबरदस्तीने कोणतेही श्रम करायला लावणे. यामध्ये मुलांना अतिशय धोकादायक आणि अत्यंत खराब परिस्थितीत काम करायला लावले जाते. असे काम त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक आरोग्यावर विपरीत परिणाम करते. बालकामगारांच्या छायेत वाढणारी मुले बालपण हरवून बसतात. त्यांचे शिक्षण थांबते, आत्मविश्वास उध्वस्त होतो, आणि त्यांची आयुष्यभराची वाटचाल अंधारात जाते.
‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, सरकारे आणि संस्था यांना अधिक सक्रीय करणे आणि बालमजुरीला पूर्णपणे संपवण्याच्या दिशेने प्रयत्न करणे. जागतिक आकडेवारीनुसार, अजूनही कोट्यवधी मुलं विविध देशांत काम करण्यास भाग पाडली जात आहेत. विशेषतः दारिद्र्य, अशिक्षण, सामाजिक विषमता, युद्धजन्य परिस्थिती आणि अपुरे कायदे हे त्यामागचे प्रमुख कारण आहेत.
बालकामगार थांबवण्यासाठी केवळ कायदे असून चालत नाही, तर समाजाची सक्रिय भूमिका आवश्यक आहे. जर कोठेही मुलांना कामावर लावले जात असेल, शोषण केले जात असेल, तर त्याबाबत त्वरित स्थानिक प्रशासन अथवा बालसुरक्षा संस्थांना कळवले पाहिजे. यासोबतच गरजू कुटुंबांना सरकारच्या योजना, शिक्षणविषयक मदत आणि रोजगारविषयक पर्याय यांची माहिती देणेही महत्त्वाचे आहे. शिक्षण हक्काचा प्रभावी अंमलबजावणी हीच या समस्येवर कायमची मूळ उपाययोजना आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमारमध्ये चीनला मोठा धक्का; बंडखोरांनी मशीनगनने पाडले 72 कोटींचे चिनी लढाऊ विमान
‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ म्हणजे एक सामाजिक बांधिलकी. हा दिवस आपल्याला विचार करायला लावतो – आपण समाज म्हणून बालकांसाठी काय करत आहोत? त्यांचे बालपण वाचवण्यासाठी आपली पावले कोणत्या दिशेने चालली आहेत? एक सशक्त, शिक्षित आणि सन्मानित पिढी घडवायची असेल, तर बालमजुरीला पूर्णविराम द्यावा लागेल.