नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता 'ई-कुंडली' आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात (फोटो सौजन्य-X)
नाशिक : शहरातील चाळीस सिग्नलवरील सीसीटीव्हींमार्फत बेशिस्त चालकांच्या वाहनांचे क्रमांक हेरून ई-चलान ठोठविण्याच्या कारवाईला अखेरीस शुक्रवारी (दि. २०) सुरूवात झाली आहे. शुक्रवारी साडेआठ तासांत सुमारे सोळा हजार चालकांनी ‘सिग्नल ब्रेक’ केला असून सातशेहून अधिक चालक ‘झेब्रा’ पट्ट्यावर उभी असल्याची नोंद ‘ई-सिस्टिम’ने केली. त्यामुळे बेशिस्तांची पूर्ण ‘ई-कुंडली’ आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात तयार होत असून, शिस्त पालनाशिवाय नागरिकांना पर्याय नाही.
2018 पासून सीसीटीव्हीद्वारे शहरात ‘ई-चलान’ सुरू करण्याबाबत पोलिस आयुक्तालय स्मार्ट सिटीकडे पाठपुरावा करत होते. सन २०२४ आणि सन २०२५ मध्ये पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराची कानउघाडणी केली होती. त्यानंतर कार्यवाही करत स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचा ‘फीड’ नियंत्रण कक्षात देण्यात आला. त्यामुळे शहर आयुक्तालयाच्या ‘दृष्टीत’ आले होते. मात्र, कॅमेऱ्यांद्वारे ई-चलान ठोठविण्याची प्रक्रिया सुरू केलेली नव्हती. पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस २० फेब्रुवारीपासून बेशिस्तांना ‘ई-चलान’द्वारे दंड ठोठविण्यास सुरुवात झाली.
हेदेखील वाचा : हिंगोली शहर वाहतूक कोंडीत गुदमरतेय; प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार ? नियोजनशून्य कारभार
वाहतूक पोलिस उपायुक्त किरिथिका सी. एम. आणि सहा. आयुक्त अद्विता शिंदे, गुन्हे सहा. आयुक्त संदीप मिटके यांनी कारवाईचा नियंत्रण कक्षातून आढावा घेतला. त्यामुळे अखेरीस सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कॅमेऱ्यांची कामे पूर्णत्वास येत असताना सीसीटीव्हीद्वारे ‘ई-चलान’ सुरू झाल्याने बेशिस्तांची ‘नाकाबंदी’ सुरू झाली आहे.
अडीच लाख चालकांनी मोडला सिग्नल
शहरातील चाळीस सिग्नलवर सिग्नल मोडण्याची घाईच वाहनचालकांना असते. सीसीटीव्ही कॅमेरे अशा वाहनचालकांचे छायाचित्र लागलीच नियंत्रण विभागातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना पाठवतो. मागील आठवड्यात तब्बल दोन लाख ५७ हजार २३२ वाहनचालकांनी सिग्नल जम्प केला. शुक्रवारी (दि.२०) सकाळी नऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत १६ हजार ०७१ वाहनचालक सिग्नल मोडून गेलेत. या सर्वांचा डेटा वाहतूक शाखेकडे आहे. मात्र, दंडात्मक कारवाई शुक्रवारपासूनच सुरू झाल्याने या वाहनचालकांना आर्थिक फटका बसला नाही.
झेब्रा क्रॉसिंगही पाळा
झेब्रा क्रॉसींग नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. मागील आठवड्यापासून १३ हजार ६६० तर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंत ७४६ वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन केले. वाहतूक सिग्नल नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांची संख्या मोठी आहे. आठवड्याभरात १४ लाख ६५ हजार १०५ वाहनचालकांनी झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नल जम्पिंग सारख्या नियमांचे काटेकोर पालन केले.
वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन
वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते. त्यामुळे स्वयंचलित कॅमेऱ्याच्या मदतीने फोटो काढून दंडात्मक कारवाई केली जाते. कर्मचाऱ्यांची संख्या लवकरच वाढवून सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या प्रत्येक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात झाली.
– किरिथिका सी. एम., पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग






