World Fish Migration Day 2025 : स्थलांतरित मासे म्हणजे निसर्गातील एक विलक्षण चमत्कार जणू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Fish Migration Day 2025 : पाणी ही जीवनरेषा आहे आणि स्थलांतरित मासे या जीवनरेषेचे अत्यंत महत्त्वाचे घटक. याच सजीव आणि निसर्गातील महत्त्वपूर्ण नात्याला उजाळा देणारा ‘जागतिक मासे स्थलांतर दिन’ हा दर दोन वर्षांनी साजरा केला जाणारा एक जागतिक स्तरावरील जनजागृतीचा उपक्रम आहे. या दिवशी जगभरातील संस्था, पर्यावरणप्रेमी, शाळा, संशोधक आणि स्थानिक समुदाय नद्या, मासे आणि लोकांना जोडणारे विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करतात. ही दिनविशेष संकल्पना २०१४ ते २०२४ पर्यंत ‘वर्ल्ड फिश मायग्रेशन फाउंडेशन’ (WFMF) या संस्थेने पुढे नेली. आता २०२५ पासून हाच उपक्रम नेदरलँड्समधील ‘VENAE’ ही संस्था राबवत असून, हर्मन वॅनिंगेन हे संस्थापक आणि प्रमुख आयोजक म्हणून काम पाहत आहेत.
स्थलांतरित मासे हे त्यांच्या जीवनचक्रात दीर्घ अंतर पार करून नदी-समुद्रांच्या दरम्यान प्रवास करणारे जलजीव आहेत. हे मासे केवळ अन्नसाखळीचा भाग नाहीत, तर मानव आणि मानवेतर प्रजाती, जमीन आणि पाण्याशी सखोल नातं जोडणारे जैवसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. जागतिक स्तरावर दरवर्षी स्थानिक कार्यक्रमांद्वारे ‘जागतिक मासे स्थलांतर दिन’ साजरा केला जातो. या उपक्रमांचा उद्देश स्थलांतरित माशांबद्दल शिकणे, त्यांची कल्पना करणे आणि त्यांच्यासाठी कृती करणे हा असतो. मुक्त वाहणाऱ्या नद्यांची गरज, मासांमधील जैवविविधता, आणि मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे धोके याबाबत जागरूकता वाढवणे हे या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, भारताच्या ‘S-400’ ने पाकच्या AWACS चा उडवला धुवा; रचला विश्वविक्रम
अलीकडे WFMF, ZSL, IUCN, WWF आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी एक संयुक्त अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला असून, गोड्या पाण्यातील स्थलांतरित मासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे त्यातून समोर आले आहे. १९७० ते २०२० या ५० वर्षांच्या कालावधीत जागतिक स्तरावर स्थलांतरित माशांच्या संख्येत तब्बल ८१% घट झाली आहे. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये ही घट ९१% तर युरोपमध्ये ७५% इतकी आपत्तीजनक नोंदवली गेली आहे. ही आकडेवारी ‘लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स’ (LPI) च्या नव्या अहवालात स्पष्ट झाली आहे.
या घटतेपणामागची प्रमुख कारणं म्हणजे
1. नद्यांवर बांधण्यात आलेली धरणं आणि इतर अडथळे
2. पाणथळ भागांचे शेतीसाठी रूपांतर
3. अति मासेमारी आणि अतिरेकी शोषण
4. प्रदूषणाचे वाढते प्रमाण
5. हवामान बदलाचे भयावह परिणाम
हे सर्व घटक माशांच्या स्थलांतराच्या नैसर्गिक मार्गात अडथळे निर्माण करतात. परिणामी, माशांचे प्रजनन, अन्नसाखळी आणि जैवविविधतेवर विपरित परिणाम होतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील
या जागतिक दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी नद्यांची स्वच्छता, धरण बांधकामांवरील पुनर्विचार, जैवविविधतेची जपणूक आणि पर्यावरणसंवेदनशील विकास यांसाठी आवाज उठवावा. पाण्यातील जीवनाकडे फक्त अन्न किंवा व्यापाराच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यांचं जीवनही जपण्यासारखं आहे, हे समजून कृती केली पाहिजे. “नद्या वाहू द्या, मासे पोहू द्या आणि जीवन फुलू द्या” या संदेशासह जागतिक मासे स्थलांतर दिन एक नवीन पर्यावरणीय जागृती घडवतो. आपण त्याचे भाग होऊया शिकूया, कल्पना करूया आणि कृती करूया.