World Population Day 2025 : वाढती लोकसंख्या की मानवी संकट? जाणून घ्या कधीपासून सुरु झाला हा दिवस ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Population Day 2025 : दरवर्षी ११ जुलैला ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा केला जातो. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे वाढत्या लोकसंख्येबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यातून उद्भवणाऱ्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधणे. 2025 मध्ये या दिवसाची थीम आहे “तरुणांना सक्षम करणे जेणेकरून ते निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांचे इच्छित कुटुंब तयार करू शकतील.”
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे 9.7 अब्जांपर्यंत पोहोचेल, हे लक्षात घेतल्यास भविष्यातील अन्न, पाणी, आरोग्य व शिक्षणसुविधांवर ताण येण्याची शक्यता आहे. भारताची लोकसंख्या सध्या 1.46 अब्जच्या पुढे गेली आहे आणि या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. चीन आता दुसऱ्या स्थानावर असून तिथेही 1.41 अब्जहून अधिक लोकसंख्या आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Heatwave 2025 Europe : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! 10 दिवसांत 2300 मृत्यू, हवामान बदल ठरतोय प्राणघातक
हा विशेष दिवस १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) ने अधिकृतपणे सुरू केला. परंतु या दिवसाची मूळ कल्पना ११ जुलै १९८७ ला आली, जेव्हा जगाची लोकसंख्या पाच अब्जांवर पोहोचली. त्या ऐतिहासिक क्षणाला ‘The Day of Five Billion’ म्हणून साजरे करण्यात आले. त्यातूनच पुढे जागतिक लोकसंख्या दिन जन्माला आला.
लोकसंख्येच्या अनियंत्रित वाढीमुळे गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, प्रदूषण, अन्नटंचाई, पाणी संकट, आणि आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. हे सर्व प्रश्न एकमेकांशी जोडलेले आहेत. जर लोकसंख्या मर्यादेत राहिली नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण मानवजातीच्या भविष्यावर होऊ शकतो.
यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम ‘Empowering Youth to Choose Their Future Families’ वर आधारित आहे. आजची तरुण पिढी ही उद्याची समाजशिल्पी आहे. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार, जबाबदारीने व योजनाबद्ध पद्धतीने कुटुंब निर्मिती करता यावी, यासाठी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याशी संबंधित पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे.
जागतिक लोकसंख्या दिन साजरा केल्याने सरकार, संस्था व सामान्य नागरिक यांच्यात जागरूकता वाढते. या निमित्ताने विविध कार्यक्रम, परिसंवाद व जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. या उपक्रमांचा उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाने ‘लोकसंख्या’ या मूळ समस्येकडे गांभीर्याने पाहणे आणि स्वतःपासून सुरुवात करून समाजात सकारात्मक बदल घडवणे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बिलावल भुट्टोंचा मोठा गौप्यस्फोट! पहिले भारताबद्दल ओकली गरळ आणि आता पाकिस्तानचे सर्व सीक्रेट्स केले जगजाहीर
जागतिक लोकसंख्या दिन हा फक्त एक दिवस साजरा करण्यासाठी नसून, तो मानवजातीच्या भविष्यासाठी एक इशारा आहे. जर आज आपण सजग झालो नाही, तर उद्याचा दिवस अधिक कठीण ठरू शकतो. म्हणूनच, लोकसंख्येच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.