सौजन्य - सोशल मिडीया
लोकांना घरात पाळीव प्राणी पाळायची फार हौस असते. त्यासाठी मांजर आणि श्वान अशा दोन पर्यायांनाच लोक प्रामुख्याने पसंती देतात. श्वान हे प्रेमळ असतात आणि घराचे रक्षण करतात त्यामुळे त्यांना बरेच लोक पसंती देतात तर काही गोंडस आणि मस्तीखोर मनीमाऊला सुद्धा पसंती देतात. कदाचित वाघ, सिंह ते भटक्या मांजरांपासून सर्वच सवयी सारख्या असल्याने मांजराला वाघाची मावशी असे म्हटले जाते. पाळीव मांजरांपासून ते रानमांजरांपर्यंत प्रत्येक प्रकारच्या मांजरांना शिकार करता येते. शिकार कारण्याचा गुण त्यांचा मध्ये असतो. मग ती शिकार उंदराची असो किंवा जंगलातील एखाद्या प्राण्याची मांजरी ह्या उत्तम शिकारी असतात.
रस्टी स्पॉटेड अन् दुर्मीळ ब्लॅक फुटेड शिकारी मांजरी जगातील आकाराने सर्वात लहान असतात. या मांजरीचा आकार हा अगदी लहान म्हणजे तळहातात मावण्याइतका असतो. आणि ह्या मांजरी शिकार करण्यात अगदी तरबेज असतात. आशिया खंडातील भारत, नेपाळ आणि श्रीलंकेच्या काही भागात या दोन प्रजातीच्या मांजरी आढळतात. या मांजरीला ‘स्मॉल स्पॉटेड कॅट’ असेदेखील म्हटले जाते ही जगातील सर्वात दुर्मीळ स्पॉटेड मांजर म्हणून ओळखली जाते.
उंदीर आणि लहान पक्षी असा या दोन मांजरींचा आहार असतो. या दोन मांजरी निशाचर असतात. या मांजरींचा आकार लहान असला तरीही या त्यांच्या वजनापेक्षा आकाराने मोठ्या सशांचीदेखील शिकार करतात. कोणतीही हालचाल क्षणात टिपण्यात या मांजरी तरबेज असतात कारण रस्टी स्पॉटेड मांजरीची दृष्टी ही आपल्या दृष्टीपेक्षा सहापट जास्त असते. या मांजरी ओल्या दमट पानगळीच्या जंगलात वास्तव्य करतात.
ताडोबा आणि पश्चिम घाट परिसरात प्रामुख्याने या मांजरी आढळून येतात. सर्व मांजर प्रजातींमधील सर्वोत्तम शिकारी आणि सर्व सस्तन प्राण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर शिकार करण्यासाठी ह्या दोन प्रजातीच्या मांजरी प्रसिद्ध आहेत. आफ्रिकन जंगली कुत्रे शिकारीत ८५ टक्के यशस्वी होतात त्यामुळे ते शिकार करण्यात पहिल्या स्थानावर असतात. तर ह्या शिकारी मांजरी दुसऱ्या स्थानावर असतात. सध्या सुरू असणाऱ्या ब्लॅक फुटेड मांजरांच्या अभ्यासामध्ये असे समोर आले कि या मांजरी चाळीस विविध प्राणी खातात. तब्ब्ल १.४ मीटर्स म्हणजेच साधारण ४ फुटांहून अधिक उंच उडी मारून, पक्षांचीदेखील शिकार करू शकतात. दिसायला अतिशय गोंडस असणाऱ्या या मांजरी आता दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे अशा प्रजातींच्या रक्षणासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.