Amey Khurasia (Photo Credit- X)
संघ लोकसेवा आयोगात (UPSC) यशस्वी होण्याचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात असते. भारतातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक परीक्षांपैकी एक म्हणून UPSC ओळखली जाते, ज्यात दरवर्षी लाखो उमेदवार सहभागी होतात. पण तुम्हाला माहीत आहे का, एक असाही माजी भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती? अमेय खुरासिया (Amay Khurasiya) हे असे एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी हा दुर्मिळ पराक्रम केला आहे.
१९७२ मध्ये मध्य प्रदेशमध्ये जन्मलेल्या खुरासिया यांनी वयाच्या 17 व्या वर्षीच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा यांसारख्या क्रिकेटच्या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती. 1999 मध्ये त्यांनी श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून या डावखुऱ्या फलंदाजाने 45 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी केली होती.
त्यांची निवड 1999 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघातही झाली होती, मात्र संघाची फलंदाजी खूप मजबूत असल्याने त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. त्यांनी भारतासाठी फक्त 12 एकदिवसीय सामने खेळले आणि 149 धावा केल्या. त्यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी 7,000 हून अधिक धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच अमेय खुरासिया यांनी UPSC परीक्षा पास केली होती, पण त्यांनी क्रिकेटमध्येच करिअर पुढे नेण्याचा निर्णय घेतला. खराब फॉर्ममुळे संघाबाहेर पडल्यानंतर अमेय खुरासिया यांनी भारतीय कस्टम्स आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक (Inspector) म्हणून काम सुरू केले. त्यासोबतच, त्यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कामही केले. त्यांनी रजत पाटीदार आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांसारख्या युवा खेळाडूंना कोचिंग दिली आहे.