दुलीप ट्रॉफीमध्ये आकिब नबीने घेतली हॅटट्रिक(फोटो-सोशल मीडिया)
Aqib Nabi takes hat-trick in Duleep Trophy: दुलीप ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात उत्तर विभागाचा गोलंदाज आकिब नबीने जादुई कामगिरी केली आहे. आकिब नबीने पूर्व विभागाविरुद्ध हॅटट्रिक घेऊन कमाल केली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये हॅटट्रिक घेणारा तो तिसराच गोलंदाज ठरला आहे. आकिब नबीने ५ विकेट्स घेऊन पूर्व विभागाला २३० धावांवर गुंडाळले आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपपूर्वी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ! BCCI मुळे ओढवली मोठी नामुष्की
बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर खेळवल्या जाणाऱ्या उत्तर विभाग आणि पूर्व विभाग यांच्यातील क्वार्टर फायनल सामन्यात जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथील वेगवान गोलंदाज आकिब नबीने ५३ व्या षटकात हॅटट्रिक घेण्याची किमया साधली. आकिब नबीने फलंदाजांना वेळच दिला नाही. त्याने १० धावांवर सूरज जयस्वालला बाद केले आणि यष्टिरक्षक कन्हैया वाधवानकडून झेलबाद केले, त्यानंतर आलेल्या मनीषीला त्याने शून्यावर एलबीडब्ल्यू बाद केले आणि खाते न उघडता मुख्तार हुसेनला क्लीन बोल्ड करून टाकले.
हॅटट्रिक घेण्यापूर्वी नबीने विराट सिंगला ६९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर माघारी पाठवले. त्यानंतर, त्याने सलग तीन बळी घेत पूर्व विभागाचे कंबरडे मोडले. शेवटी, त्याने मोहम्मद शमीला बाद करून पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. आकिब नबीने १०.१ षटकात २८ धावा देत ५ बळी टिपले. यामध्ये हॅटट्रिकचा देखील समावेश आहे. यासह, तो कपिल देव आणि साईराज बहुतुले यांच्यानंतर दुलीप ट्रॉफीमध्ये हॅटट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
१९७८-७९ च्या हंगामात दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात उत्तर विभागाकडून खेळताना कपिल देवने पश्चिम विभागाविरुद्ध हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे, २०००-०१ च्या हंगामात पुण्यातील नेहरू स्टेडियमवर पश्चिम विभागाकडून खेळताना साईराज बहुतुलेने पूर्व विभागाविरुद्ध खेळताना ही किमया केली होती. यासह, तो कपिल देवच्या खास पंक्तीत जाऊन बसला.
हेही वाचा : Duleep Trophy 2025 : Danish Malewar ने इतिहास रचला! ‘असे’ करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
आकिब नबीने आतापर्यंत २९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये त्याने १,९९१ धावा देऊन ९० बळी टिपले आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी २२.१२ इतकी आहे, जी या स्वरूपात त्याची प्रभाव दाखवून देते, त्याची सर्वोत्तम गोलंदाजी एका डावात ५३ धावा देऊन ६ बळी घेणे ही राहिली आहे. तर एका सामन्यात त्याची सर्वोत्तम कामगिरी ही ७४ धावा देऊन १० बळी टिपने ही राहिली आहे. नबीने आतापर्यंत ८ वेळा एका डावात पाच बळी आणि २ वेळा सामन्यात दहा बळी घेण्याची किमया साधली आहे. त्याच वेळी, लिस्ट ए क्रिकेटमध्ये, नबीने २९ सामन्यात ४२ बळी टिपले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची गोलंदाजीची सरासरी २८.८८ इतकी आहे, सर्वोत्तम कामगिरी ४/३९ आहे, इकॉनॉमी रेट ५.०७ आहे आणि स्ट्राईक रेट ३४.१ आहे. या अकडेवारीवरून औकिब नबीची प्रतिभा लक्षात येते.