ऑस्ट्रेलिया संघ(फोटो-सोशल मीडिया)
WTC Final : 11 जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ च्या अंतिम सामन्याला सुरवात होणार आहे. हा सर्वात मोठा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना ११ ते १५ जून दरम्यान लंडनमधील ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर होणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने देखील वर्ल्ड टेस्ट अजिंक्यपद फायनल २०२५ साठी आपला प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. जेतेपदाच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघातील वरिष्ठ खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या फायनल सामन्यासाठी उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांच्यावर सलामीवीर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच वेळी, सॅम कॉन्स्टासला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा ख्वाजा गेल्या काही काळापासून दमदार खेळ करताना दिसून येत आहे. दुसरीकडे, मार्नस लाबुशेनने संघात एक तगडा फलंदाज म्हणून छाप पाडली आहे. याशिवाय, स्टीव्ह स्मिथ आणि स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडचा मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे. जेतेपदाच्या सामन्यात अॅलेक्स कॅरी यष्टीरक्षक म्हणून खेळताना दिसणार आहे. तसेच गोलंदाजीमध्ये वेगवान विभागात पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवुड ही जबाबदारी बघणार आहेत. तर फिरकीची धुरा नॅथन लायनकडे असणार आहे.
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ११ जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी दक्षिण आफ्रिका संघाने जेतेपदाच्या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वियान आणि ट्रिस्टन स्टब्स यांनास्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, रायन रिकेल्टन देखील या महान सामन्यासाठी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांना संघात स्थान मिळाले आहे. त्याच वेळी, मार्को जॅन्सन अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेच्या संघात फिरकीची जबाबदारी सांभाळणार आहे.
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.