गुरुवारी झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला अवघ्या एका धावाने पराभव स्वीकारावा लागला. भारत आणि नंतर पाकिस्तान सोबत झालेला विश्वचषकातील सलग दुसरा पराभव पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास धूसर झाल्या आहेत. या पराभवामुळे बाबर आझम निराश झालेला दिसला.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर निराश झालेल्या बाबर आझमने पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘आमच्या संघाची कामगिरी खूपच खराब झाली. फलंदाजीत आम्हाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आमच्याकडे चांगले फलंदाज होते पण दोन्ही सलामीवीर पॉवरप्लेमध्ये बाद झाले. जेव्हा शादाब आणि शान मसूद भागीदारी करत होते पण दुर्दैवाने शादाब बाद झाला आणि त्यानंतर पाठीमागे विकेट पडल्यामुळे आम्ही दडपणाखाली आलो.
गोलंदाजीबद्दल बोलताना बाबर म्हणाला की, पहिल्या ६ षटकांमध्ये आम्ही नवीन चेंडूचा चांगला वापर केला नाही. पण शेवटी आम्ही चेंडूने चांगली कामगिरी केली. आम्ही आमच्या चुकांवर बसून चर्चा करू. आम्ही कठोर प्रशिक्षण देऊ आणि पुढील सामन्यात जोरदार पुनरागमन करू.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने ८८धावांवर ५ वी विकेट गमावली तेव्हा मोहम्मद नवाज फलंदाजीला आला. त्यावेळी संघाला ३७ चेंडूत ४३ धावांची गरज होती. नवाजने हळूहळू पाकिस्तानचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती.
नवाजने पहिल्या चेंडूवर तीन धावा घेत मोहम्मद वसीम ज्युनियरला स्ट्राइक दिली. मात्र, पुढच्याच चेंडूवर वसीमने चौकार मारला. यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर धाव घेत नवाजला स्ट्राइक परत दिली. चौथ्या चेंडूवर नवाजला एकही धाव करता आली नाही. आणि दोन चेंडूत ३ धावांची गरज असताना तो त्या चेंडूवर तो बाद झाला.