मेहदी हसन(फोटो-सोशल मीडिया)
BAN vs SL : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात मेहदी हसनने दमदार कामगिरी करून सामना जिंकून दिला आहे. मेहदी हसनच्या या कामगिरीने बांगलादेशने टी-२० मालिका आपल्या खिशात टाकली आहे.बांगलादेशकडून मेहदी हसनने गोलंदाजीत ऐतिहासिक कामगिरी करून इतिहास रचला आहे. त्याने चार षटकांत चार विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात तिसरा टी-२० सामना पार पडला आहे. या सामन्यात मेहदीने चार षटकांत ११ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीने त्याने या मैदानावर टी-२० मध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा नवा विक्रम रचला आहे. त्याने २०१२ च्या टी-२० विश्वचषकात भारताचा दिग्गज हरभजन सिंगने १२ धावांत ४ विकेट्स घेण्याचा विक्रम मोडीत कढला आहे.
हेही वाचा : आधी डी.गुकेश आता प्रज्ञानंद पडला कार्लसनवर भारी; फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅममध्ये भारतीय स्टारची मात
मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा ८ विकेट्सने पराभव केला. यासह, बांगलादेश संघाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. बांगलादेशने हा सामना २१ चेंडू शिल्लक राखून जिंकला आहे. मेहदी हसनने संथ खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचे फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजांविरुद्ध टिकाव धरू शकले नाहीत. पथुम निस्सांकाने चांगली झुंज देणायचा प्रयत्न केला परंतु त्याला अर्धशतक मात्र पूर्ण करता आले नाही. त्याने ३९ चेंडूत ४९ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त, कर्णधार दासुन शनाकाने २५ चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी साकारली.
श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून फक्त १३२ धावाच करू शकला. संघाचे ६ फलंदाज दुहेरी आकडा देखील गाठण्यात अपयशी ठरले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मेहदी हसन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ४ षटकांत फक्त ११ धावा देत सर्वाधिक ४ गडी बाद केले.
१३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर तन्जीद हसनने आक्रमक फलंदाजीचा नमुना पेश करत ४७ चेंडूत ७३ धावा फटकावल्या. त्याच वेळी कर्णधार लिटन दासने २६ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले. बांगलादेशने १६.३ षटकांतच २ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. श्रीलंकेकडून नुवान तुषारा आणि कामिंदू मेंडिस यांनी १-१ विकेट केली.