आर प्रज्ञानंदाने आणि मॅग्नस कार्लस(फोटो-सोशल मीडिया)
Praggnanandh defeated Carlos : लास वेगास येथे फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्लॅम टूर दरम्यान १९ वर्षीय प्रज्ञानंदाने देशाचे मान उंचावली आहे. भारताच्या ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने या स्पर्धेत जागतिक नंबर १ खेळाडू मॅग्नस कार्लसनला पराभूत केले आहे. याआधी भारताच्या डी. गुकेशने कार्लसनला हरवले होते. प्रज्ञानंदने पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मॅग्नस कार्लसनला फक्त ३९ चालींमध्येच गारद केले.
नॉर्वेच्या ग्रँडमास्टर कार्लसन, ज्याला अलीकडेच भारताचा सध्याचा विश्वविजेता डी गुकेशकडून सलग पराभूत व्हावे लागले होते. आता भारतीय खेळाडूकडून त्याला आणखी एक पराभव पत्करावा लागला आहे. स्पर्धेच्या गट टप्प्याच्या चौथ्या फेरीत १९ वर्षीय आर प्रज्ञानंदाने कार्लसनला पराभूत केले आहे. या स्पर्धेत, प्रत्येक खेळाडूला प्रत्येक चालीवर १० मिनिटे वेळ आणि १० सेकंद अतिरिक्त मिळत असतात. प्रज्ञानंद आता आठ खेळाडूंच्या पांढर्या गटात ४.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहे.
प्रज्ञानंदाने नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हविरुद्ध काळ्या तुकड्यांसह बरोबरी करून स्पर्धेची सुरुवात केली. यानंतर त्याने असौबायेवाला हरवले. तिसऱ्या फेरीत त्याने काळ्या तुकड्यांसह खेळत कीमरला पराभूत केले. त्यांनंतर चौथ्या फेरीत कार्लसनला धक्का दिला.
कार्लसनने पॅरिस आणि कार्लस्रुहे येथे फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या असून तो संपूर्ण दौऱ्यात अव्वल स्थानावर होता, परंतु आता मात्र त्याला लास वेगासमध्ये जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेरचा रस्ता धरावा लागला. राउंड-रॉबिन टप्प्यात एका चढ-उताराच्या दिवसानंतर, कार्लसन त्याच्या गटामध्ये संयुक्तपणे चौथ्या स्थानावर राहिला आणि प्लेऑफमध्ये लेव्हॉन अॅरोनियनकडून पराभव पत्करल्यानंतर त्याला बाहेर जावे लागले. आता तो खालच्या ब्रॅकेटमध्ये पोहोचला आहे, जिथे तो तिसऱ्या स्थानापेक्षा वर येऊ शकणार नाही.
कार्लसनने दोन विजयांसह आपली चांगली सुरुवात केली, परंतु नंतर त्याची कामगिरी खूप घसरली. प्रज्ञानंद आणि वेस्ली सो यांच्याकडून पराभव आणि दोन बरोबरीनंतर, टायब्रेकरमध्ये पोहोचण्यासाठी त्याला अंतिम फेरीत विजय खूप जास्त आवश्यक होता. त्याने बिबिसारा असौबायेवला पराभूत केले. परंतु, नंतर दोन्ही प्लेऑफ गेम अॅरोनियनकडून गमावले. यामुळे तो वरच्या ब्रॅकेटमध्ये पोहचू शकला नाही. त्याच गटात, प्रज्ञानंद, नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि जावोखिर सिंदारोव्ह यांनी ४.५/७ गुण मिळवत टेबलमध्ये अव्वल स्थान काबीज केले.
हिकारू नाकामुरा ब्लॅक ग्रुपमध्ये उत्तम कामगिरी करून ७ पैकी ६ गुण मिळवले आणि टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. सुरुवातीला ५ पैकी ४.५ गुण मिळवणाऱ्या हान्स निमनने देखील पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्याच्यासोबत फॅबियानो कारुआना आणि अर्जुन एरिगाइसी यांनी देखील चांगली आगेकूच केली. कारुआनाने त्याचे पहिले सहा सामने अनिर्णित ठेवले होते परंतु शेवटच्या फेरीत निमनला धूळ चारत आवश्यक असलेला विजय मिळवला.
लास वेगासमधील विन हॉटेलमध्ये फ्रीस्टाइल बुद्धिबळाच्या अमेरिकेच्या पदार्पणासोबत, १६ खेळाडूंनी आता बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. कार्लसन आणि कीमरसारखे यातील निम्मे खेळाडू खालच्या गटातून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. तर उर्वरित थेट जेतेपदाच्या शर्यतीत राहणार आहेत. गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये पराभव पदरात पडलेले खेळाडू वरच्या गटातून खालच्या गटात जाणार आहेत.