BCCI Central Contract : बीसीसीआयचा केंद्रीय करार जाहीर; 'या' तीन खेळाडूंचे नशीब फळफळले, ए ग्रेडमध्ये मिळाले स्थान...(फोटो;सोशल मीडिया)
BCCI Central Contract : बीसीसीआयकडून महिला खेळाडूंचे केंद्रीय करार जाहीर करण्यात आले आहेत. बीसीसीआयने सोमवारी 2024-25 हंगामासाठी 16 महिला खेळाडूंचा समावेश केला आहे. गेल्या वर्षी बीसीसीआयने 17 महिला खेळाडूंना केंद्रीय करारात समावेश केला होता, मात्र यावेळी एका खेळाडूला थेट करारातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
बीसीसीआयने भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा या खेळाडूंना ए ग्रेडमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. जी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या केंद्रीय कराराची सर्वोच्च श्रेणी मानली जाते. रेणुका ठाकूर, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष आणि शेफाली वर्मा यांना बी श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तर गोलंदाज राजेश्वरी गायकवाडला यादीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
युवा ऑफस्पिनर श्रेयंका पाटील, वेगवान गोलंदाज तीतास साधू आणि अरुंधती रेड्डी, अष्टपैलू अमनजोत कौर आणि यष्टिरक्षक उमा छेत्री यांचा प्रथमच केंद्रीय करारात स्थान देण्यात आले आहे. यास्तिका भाटिया, राधा यादव, अमनजोत कौर, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांना सी ग्रेडमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मध्यवर्ती करारात स्थान न मिळालेल्या खेळाडूंमध्ये मेघना सिंग, सबिनेनी मेघना, देविका वैद्य, अंजली सरवानी आणि हरलीन देओल यांचा समावेश आहे.
ज्या महिला खेळाडूंना ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यांना वार्षिक 50 लाख रुपये मिळणार आहेत. तर ज्या खेळाडूंना बी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे त्यांना वार्षिक 30 लाख रुपये तर सी श्रेणीमध्ये स्थान मिळालेल्या खेळाडूंना वार्षिक 10 लाख रुपये मिळतील. याबाबत बीसीसीआयने घोषणा केली आहे.
मागील वर्षी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करारातून वगळण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. डोमेस्टिक क्रिकेट न खेळल्यामुळे दोघांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर श्रेयस अय्यरचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याशिवाय इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपली छाप पाडत चमकदार कामगिरी केली. आता दोघेही आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी गेल्या गुरुवारी (२० मार्च) स्पोर्टस्टारला सांगितले की महिलांच्या केंद्रीय करारावर आमची चर्चा झाली असून पुरुषांच्या केंद्रीय करारावर मात्र अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.