दिलीप सरदेसाई ८५ जन्मदिन(फोटो-सोशल मीडिया)
Dilip Sardesai 85 Birthday : भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज दिलीप सरदेसाई यांचा आज ८ ऑगस्ट २०२५ रोजी ८५ वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी झाला होता. ते गोव्यासाठी भारतीय संघात खेळणारे पहिले खेळाडू ठरले होते. त्यांनी फलंदाज म्हणून भारतासाठी अनेक वेळा शानदार खेळी साकारल्या आहेत. दिलीप सरदेसाई यांनी २ जुलै २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला होता.
भारतीय क्रिकेट इतिहासातील आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि विशेष असा आहे. गोव्यात जन्मलेले दिलीप नारायण सरदेसाई यांनी १९६० आणि ७० च्या दशकात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. ते आपल्या फलंदाजीने भारतीय संघापासून प्रतिस्पर्ध्यांला पळवून लावत असत. त्या काळात त्यांना भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ मानले जात होते.
हेही वाचा : Asia Rugby U20s Sevens Championship 2025 : बिहारमध्ये 8 देशांमध्ये होणार विजेतेपदाची लढाई
दिलीप सरदेसाई यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी गोव्यातील मडगाव येथे झाला. त्यांनी मुंबईकडून स्थानिक पातळीवर आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आणि लवकरच त्यांनी आपल्या प्रतिभेने राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतले. १ डिसेंबर १९६१ रोजी इंग्लंडविरुद्ध त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
एक अव्वल क्रमांकाचे फलंदाज म्हणून, सरदेसाई यांनी त्यांच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी ३० कसोटी सामने खेळले आणि ३९.२३ च्या सरासरीने २००१ धावा केल्या होत्या. या त्यांनी ५ शतके आणि ९ अर्धशतके झळकावली होती. त्यांची सर्वोत्तम धावसंख्या २१२ धावा राहिली आहे. त्यांनी गोलंदाजी देखील केली, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना एकही बळी मिळवता आला नाही.
मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या सरदेसाई यांनी १७९ सामन्यांमध्ये ४१.७५ च्या सरासरीने १०,२३० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २५ शतके आणि ५६ अर्धशतके जमा आहेत, तर त्यांची सर्वोच्च धावसंख्या २२२ धावा आहे. तर त्यांनी ८ बळी देखील टिपले आहेत. मुंबईतील त्यांचे योगदान मोठे आहे. आजही त्यांना तेथील महान खेळाडूंपैकी एक मानले जाते.
हेही वाचा : Asia Cup 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर भारत बहिष्कार टाकणार का? अहवालात मोठा दावा
माजी फलंदाज दिलीप सरदेसाई यांना १९७० मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनिमित्त अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील भारतीय खेळांमधील त्यांचे योगदान सुरूच राहिले. २ जुलै २००७ रोजी मुंबईत त्यांची ६६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.