वियान मुल्डर आणि ब्रायन लारा(फोटो-सोशल मीडिया)
ZIM vs SA : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डरने अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्धच्या टेस्ट सामन्यात इतिहास घडवला आहे. त्याने नाबाद ३६७ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. कर्णधार म्हणून वियान मुल्डर आता त्याच्या पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. याशिवाय, वियान दक्षिण आफ्रिकेसाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील बनला आहे. त्याच्या या खेळीने अनेक विक्रम मोडले आहेत. मात्र वियानकडे वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराचा नाबाद ४०० धावांचा विक्रम मोडण्याची चांगली संधी चालून आली होती, पण तो मोडू शकला नाही. याबाबत आता वियानने मोठा खुलासा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डर झिम्बाब्वेविरुद्ध ३६७ धावांवर खेळताना त्याने डाव घोषित केला. समोर मोठा विक्रम मोडण्याची संधी असताना त्याने डाव घोषित केला. अशा वेळी आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, वियानने ब्रायन लाराचा नाबाद ४०० धावांचा विक्रम मोडण्याची इतकी चांगली संधी का गमावली? आता दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने स्वतः यामागील खुलासा केला आहे.
२००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध दिग्गज कॅरिबियन फलंदाज ब्रायन लाराने इतिहास रचला होता. त्यावेळी त्याने इंग्लिश संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावांची नाबाद खेळी खेळली होती. तेव्हापासून आजतागायत कोणीही त्याचा विक्रम मोडू शकलेले नाही. पण दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्यात विआन मुल्डरला ही संधी चालून आली होती. पण त्याने तसे करण्याचे टाळले. विआन मुल्डर म्हणाला की, “माझ्या नशिबात काय लिहिले आहे हे कोणाला देखील माहित नव्हते पण ब्रायन लाराने तो विक्रम आपल्याच नावावर ठेवावा. मला वाटते की आम्ही दुसऱ्या चेंडूपासून पुरेशा धावा काढल्या होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रायन लारा एक उत्तम खेळाडू आहे.”
पुढे, वियान म्हणाला की, “ब्रायन लाराने इंग्लंडसारख्या मोठ्या संघाविरुद्ध ४०० धावा काढल्या होत्या, ज्यामुळे हा विक्रम खास बनला आहे. जर मला पुन्हा संधी मिळाली तरी मीही असेच करेन. मी शुक्री कॉनराड शी बोललो आणि त्यांनी सांगितले की या दिग्गज खेळाडूला हाच विक्रम कायम ठेवू द्या.”
आफ्रिकन कर्णधार वियान मुल्डर घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असा आहे. या पावलानंतर वियानचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. वियानला लाराचा विक्रम मोडण्यासाठी फक्त ३३ धावांची आवश्यकता होती, परंतु त्याने मोठे मन दाखवत हा विक्रम कायम ठेवला.