नवी दिल्ली : जगातील नंबर वन टेनिसपटू कार्लोस अल्काराझने (Carlos Alcaraz) विम्बल्डनच्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचचा (Novak Djokovic) पराभव करून इतिहास रचला. अल्काराझने कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले. त्याने गेल्या वर्षी यूएस ओपनचे विजेतेपदही पटकावले होते. विम्बल्डनमध्ये चॅम्पियन बनताच अल्काराझवर पैशांचा पाऊस पडला. 20 वर्षीय अल्काराजला विम्बल्डन जिंकल्यानंतर 23 लाख 50 हजार पौंडची बक्षीस रक्कम मिळाली. याचे भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम सुमारे 25 कोटींची आहे.
आयपीएल 2023 च्या चॅम्पियन टीमला कार्लोस अल्काराझ याच्यापेक्षा कमी बक्षीस रक्कम मिळाली. आयपीएल 2023 च्या विजेत्या CSK ला 20 कोटींची रक्कम मिळाली तर संपूर्ण IPL स्पर्धेसाठी बक्षीस रकमेचे एकूण बजेट फक्त 47 कोटी होते. त्याचवेळी, विम्बल्डनमधील एकूण बक्षीस रक्कम 47 लाख पौंड म्हणजेच 465 कोटी रुपयांमध्ये वितरित करण्यात आली आहे. इतकेच नाहीतर फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार, अल्काराझची एकूण संपत्ती 100 कोटींहून अधिक आहे. अल्काराझचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत टेनिस स्पर्धेतील बक्षीस रक्कम आहे. याशिवाय तो अनेक मोठ्या आणि लक्झरी ब्रँडसाठी एंडोर्समेंटही करतो.
विम्बल्डन जिंकणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू
जागतिक टेनिसच्या ग्रँडस्लॅम सामन्यांमध्ये गेल्या 21 वर्षांपासून बिग-4 हाच नियम होता. बिग फोरमध्ये रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांचा समावेश आहे. या चार खेळाडूंनी दोन दशकांत इतर कोणालाही त्यांच्या साम्राज्याला खीळ बसू दिली नाही, पण आता अल्काराझने ते करून दाखवले आहे. विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारा अल्काराज जगातील तिसरा सर्वात तरुण टेनिसपटू ठरला.
कार्लोससमोर जोकोविच थक्क
कार्लोस अल्काराझसाठी नोव्हाक जोकोविचला हरवणे सोपे नव्हते. पाच सेटच्या लढतीत अल्काराझने जोकोविचचा 1-6, 7-6, 6-1, 3-6, 6-4 असा पराभव केला. शेवटचा सेट खूपच रोमांचक झाला होता पण जोकोविचने 20 वर्षीय तरुण जोशसमोर पराभव स्वीकारला.