पंतप्रधान नरेंद्र मोदी(फोटो-सोशल मीडिया)
Fide World Cup 2025 : FIDE विश्वचषक २०२५ चा थरार भारतात रंगणार आहे. हा विश्वचषक गोव्यात ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. बुद्धिबळाच्या जागतिक नियामक मंडळाने मंगळवारी याबाबत घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आशा व्यक्त केली की या स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळतील.
पंतप्रधान मोदी यांनी प्रतिष्ठित FIDE विश्वचषक २०२५ चे गोव्यात आयोजन होणार म्हणून आनंद व्यक्त करताना आपल्या ‘X’ पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारत प्रतिष्ठित FIDE विश्वचषक २०२५ चे आयोजन करण्यास खूप आनंदी आहे आणि तेही दोन दशकांहून अधिक काळानंतर. बुद्धिबळ आपल्या तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. मला खात्री आहे की या स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळतील आणि जगभरातील अव्वल खेळाडू त्यांची प्रतिभा दाखवतील.”
सुरुवातीला यजमानपदासाठी नवी दिल्लीचा विचार करण्यात आला होता. परंतु लॉजिस्टिकच्या चिंतेमुळे निर्णयात बदल करण्यात आला. अखेर FIDE ने गोव्याची निश्चिती केली. गोव्यात आठ फेऱ्यांच्या नॉकआउट सामन्यांमध्ये भाग घेऊन एकूण २०६ सहभागी दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. ही स्पर्धा जिंका किंवा घरी जा या पद्धतीने खेळवली जाणार आहे. ज्यामुळे विश्वचषक हा सर्वात रोमांचक क्रीडा स्पर्धांपैकी एक बनला आहे.
पहिल्या फेरीतून अव्वल ५० मानांकित खेळाडूंना वगळण्यात येणार असून उर्वरित खेळाडू पहिल्या फेरीपासून त्यांची मोहीम सुरू करणार आहेत. प्रत्येक सामना दोन क्लासिकल गेमवर आधारित असणार आहे. जर निकल लागू शकला नाही, तर टाय-ब्रेकरसाठी रॅपिड आणि ब्लिट्झ सामने खेळवण्यात येतील. बक्षीस रक्कम आणि जेतेपदांव्यतिरिक्त, विश्वचषकात बरेच काही पणाला लावले जाणार आहे. शीर्ष तीन खेळाडू २०२६ कॅंडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरतील, जे जागतिक अजिंक्यपदाच्या मुकुटासाठी प्रमुख दावेदार ठरवले जाणार.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘तो टीम इंडियात परतणार नाही…’, श्रेयस अय्यरबद्दल प्रसिद्ध ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी..
भारताने २००२ मध्ये हैदराबादमध्ये या स्पर्धेची दुसरी आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. विश्वनाथन आनंदने २००० आणि २००२ मध्ये विश्वचषकाच्या पहिल्या दोन आवृत्यांमध्ये विजय मिळवला होता. त्याच वेळी, २०२३ मध्ये बाकू (अझरबैजान) येथे झालेल्या विश्वचषकामध्ये भारताचा आर. प्रज्ञानंद दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता, तर नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनने विजतेपद मिळवले होते. तथापि, पाच वेळा विजेता मॅग्नस कार्लसन यावेळी या प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.