फोटो सौजन्य - BCCI
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल : काल भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिकेचा दुसरा सामना पार पडला. यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन कसोटी गमावल्यानंतर मालिका गमावली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात आली आहे. न्यूझीलंडने मालिकेत दोन सामने जिंकून अजेय आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाला भारतामध्ये येऊन न्यूझीलंडने सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत केलं आहे. भारताच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये खराब सुरुवात केल्यामुळे दोन्ही सामने गमवावे लागले. न्यूझीलंडच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये सुरुवातीपासूनच टीम इंडियावर दबदबा दाखवला आणि दोन्ही सामान्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांना टिकू दिले नाही.
आता कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळू शकणार नाही का? असे झाल्यास, कोणते दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतात? आम्ही तुम्हाला याबद्दल सांगू.
हेदेखील वाचा – पाकिस्तानमध्ये 48 तासांत दुसरा दहशतवादी हल्ला; लोकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली
ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलच्या अंतिम फेरीसाठी सर्वात मोठा दावेदार आहे. कांगारू संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या चक्रात संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 8 जिंकले, 3 हरले आणि 1 अनिर्णित राहिला.
सध्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे, जी टीम इंडियापेक्षा थोडी कमी आहे. टीम इंडियाची सध्याची विजयाची टक्केवारी 62.82 आहे. टीम इंडिया बाहेर पडल्यास, ऑस्ट्रेलियाचे दुसरे स्थान आणि उत्कृष्ट विजयाच्या टक्केवारीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचा प्रबळ दावेदार असेल.
जर टीम इंडिया पात्र ठरली नाही, तर ऑस्ट्रेलियासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील दुसरा संघ श्रीलंका किंवा न्यूझीलंड असू शकतो. सध्या गुणतालिकेत श्रीलंका तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.
या चक्रात श्रीलंकेने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 5 जिंकले, 4 गमावले आणि 1 अनिर्णित राहिला. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी ५५.५६ आहे. याशिवाय न्यूझीलंडने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 5 जिंकले आणि 5 गमावले. किवी संघाची विजयाची टक्केवारी 50 आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शेवटचा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर यादरम्यान खेळवला जाणार आहे. दोन्ही झालेल्या मालिकेच्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर विराट कोहलीचा सुरु असलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.