Maharashtra won the overall title, Aryan Dawande's golden four

    Maharashtra Won Overall Title : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये शेवटच्या दिवशीही पदकांची लयलूट करीत मुले व मुली या दोन्ही गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आणि निर्विवाद वर्चस्व गाजविले. आर्यन दवंडे याने यंदाच्या या स्पर्धेत आज आणखी दोन सुवर्णपदकांची भर घालून सोनेरी चौकार मारला. शताक्षी टक्के हिने देखील सोनेरी कामगिरी करत महाराष्ट्राच्या यशात कौतुकाचा वाटा उचलला.

    या प्रकारातही सुवर्णपदक जिंकले

    आर्यन याने समांतर बार या प्रकारात सुवर्णपदक जिंकताना १२.५०० गुणांची नोंद केली. ‌त्याने व्हॉल्ट टेबल या प्रकारात १३.२०० गुणांची कमाई करीत सुवर्णपदक जिंकले तर त्याचा सहकारी सिद्धांत कोंडे याने १२.९५० कांस्यपदक जिंकले. आर्यन याने याआधी या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वसाधारण व फ्लोअर एक्झरसाईज या प्रकारातही सुवर्णपदक जिंकले होते तर रिंग्ज प्रकारात त्याला कांस्यपदक मिळाले होते.

    शताक्षी हिला सुवर्णपदक तर निशिकाला रौप्य पदक

    मुलींच्या फ्लोअर एक्झरसाईज या प्रकारात शताक्षी टक्के व तेलंगणाची निशिका अगरवाल यांचे प्रत्येकी ११.५०० गुण झाले. त्यामुळे सादरीकरणातील अचूकता व कलात्मकता याच्या आधारे शताक्षी हिला सुवर्णपदक तर निशिकाला रौप्य पदक बहाल करण्यात आले. शताक्षी हिने नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते तसेच गतवर्षी तिला खेलो इंडिया स्पर्धेतही कास्यपदक मिळाले होते. ती पुण्यातील माउंट कार्मेल कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. शताक्षी व सिद्धांत कोंडे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित जरांडे यांच्या इन्फिनिटी जिम्नॅस्टिक अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. मुलींच्या बॅलन्सिंग बीम या प्रकारात महाराष्ट्राच्या सारा राऊळ व कृष्णा शहा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले.