संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. शेअर्स आणि आयपीओत कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ७१ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. याबाबत मयूर कॉलनी येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. हा प्रकार २४ डिसेंबर २०२४ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदारांना शेअर्स व आयपीओमध्ये कमी रकमेची गुंतवणूक करून अधिकाधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नंतर एका लिंकच्या माध्यमातून त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. पुढे लिंकद्वारे पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आदी माहिती भरून नोंदणी करण्यास सांगण्यात आले. यानंतर संबंधित कंपनीच्या नावाने ट्रेडिंग करण्यास सांगत सुरुवातीला २० हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले.
सुरुवातीला काही प्रमाणात नफा दाखवून तक्रारदारांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे जमा करण्यास सांगितले. या प्रकारातून तक्रारदारांची एकूण ७१ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू असून, मोबाइल क्रमांकधारक, व्हॉट्सअॅप ग्रुप चालक तसेच संबंधित बँक खातेदारांचा शोध घेतला जात आहे.






