यशस्वी जयस्वाल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर जोडी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी मोठी (९४धावा) भागीदारी रचली. परंतु, केएल राहुल ४६ धावा करून बाद झाला. तर यशस्वी जैयस्वाल ५८ धावा करून माघारी परतला. तत्पूर्वी या दरम्यान यशस्वी जयस्वालने एक विक्रम रचला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध १००० धावा करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू ठरला आहे.
यशस्वी जयस्वाल भारताचा माजी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनसह १६ डावांमध्ये हा विक्रम करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज बनला आहे. त्याच वेळी, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. या दोघांनी देखील १५ डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे.
दरम्यान यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्ध त्याचा ९ वा सामना खेळत आहे. या दरम्यान, त्याने १६ व्या डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये १००० धावा करण्याच्या यादीत सामील होण्यासाठी जयस्वालला चौथ्या कसोटीत ५५ धावांची गरज होती. त्याने भारताच्या पहिल्या डावाच्या ३६ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर क्रिस वोक्सच्या चेंडूवर चौकार मारून हा टप्पा पार केला. इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये किमान १००० धावा करणारा जयस्वाल हा २० वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा आहे. सचिनने २४ वर्षांच्या कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध ३२ कसोटी खेळल्या आणि एकूण २५३५ धावा फटकावल्या आहेत. त्याच्यानंतर सुनील गावस्करचा क्रमांक लागतो, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध ३८ कसोटी सामन्यांमध्ये २४८३ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) १००० धावा करणारा जयस्वाल सहावा फलंदाजही ठरला आहे.
दरम्यान, भारताने टी ब्रेकनंतर 3 विकेट्स गमावून १५९ धावा केल्या आहेत.तत्पूर्वी यशस्वी जैस्वाल १०७ चेंडूत ५८ धावा काढून बाद झाला. त्याला लियाम डॉसनने बाद केले. त्याआधी केएल राहुल ४६ धावा करून माघारी गेला होता. त्याला क्रिस वोक्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांनतर भारतीय कर्णधार शुभमन गिल १२ धावा करून झटपट आउट झाला. त्याला बेन स्टोक्सने बाद केले. आता मैदानावर साई सुदर्शन २४ आणि रिषभ पंत १ धावांवर खेळत आहे.