जेमी स्मिथ(फोटो-सोशल मिडीया)
Jamie Smith’s fastest century for England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथने भारतीय गोलंदाजीला सळो की पळो करून सोडले आहे. त्याने ८० चेंडूत शतक ठोकून एक खास कामगिरी केली आहे. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा तो पहिलाच इंग्लंडचा खेळाडू ठरला आहे. यासह, तो इंग्लंडचा सर्वात जलद कसोटी शतक करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
एजबॅस्टन येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडकडून ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मिथने भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुलवले आहे. त्याने केवळ ८० चेंडूत भारताविरुद्धचे पहिले कसोटी शतक पूर्ण केले आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या ४७ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चौकार मारून त्याने आपले पहिले शतक साजरे केले.
टीम इंडियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झकळवण्याचा विक्रम माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर जमा आहे. २०१२ मध्ये १३ ते १५ जानेवारी दरम्यान पर्थच्या वाका येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात वॉर्नरने भारताविरुद्ध शतक पूर्ण करण्यासाठी फक्त ६९ चेंडूंचा सामना केला होता.
वॉर्नरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा नंबर येतो. ज्याने डिसेंबर २०१० मध्ये सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ७५ चेंडूंमध्ये १०० धावांची टप्पा पार केला होता. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने जानेवारी २००६ मध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर भारताविरुद्ध शतक पूर्ण करायला ७८ चेंडू लागले होते.
भारताविरुद्ध कसोटीतील सर्वात जलद शतके
बर्मिंगहॅम येथे दुसऱ्या कसोटीत भारताविरुद्ध स्मिथचे ८० चेंडूत १०६ धावा हे इंग्लंडच्या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमधील संयुक्त तिसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅककुलमच्या नावावर जमा आहे. मॅक्युलमने फेब्रुवारी २०१६ मध्ये क्राइस्टचर्च येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फक्त ५४ चेंडूत शतक पूर्ण केले होते.