स्टोक्स-मॅककुलम(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Eng 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे, जिथे भारताचा जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा जोफ्रा आर्चर पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. हेडिंग्ले येथे इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने जिंकला होता. तर भारताने एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध ३३६ धावांनी शानदार विजय नोंदवला आहे. स्टोक्स-मॅककुलम युगात इंग्लंडने कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. इंग्लंडने यापूर्वी २०२३ मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेदरम्यान नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा : Lord’s Cricket Ground : सचिन तेंडुलकरचा एमसीसीकडून खास सन्मान! Museum मध्ये झळकलं क्रिकेटच्या देवाच चित्र..
इंग्लंडकडून आपल्या घरच्या १२ कसोटी सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी इंग्लंडने अॅशेसमध्ये असे करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये इंग्लंडला २ विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले होते. जर आपण आकडेवारीकडे बघितलं तर इंग्लंडने पुन्हा एकदा अशी चूक केली आहे. इंग्लंडने पुन्हा एकदा भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीत विजय मिळवण्याची संधी पुढ्यात टाकली आहे.
जोफ्रा आर्चर पाठीच्या आणि कोपराच्या दुखापतीमुळे चार वर्षे कसोटी क्रिकेटपासून दूर होता. परंतु, आता आर्चर पुन्हा एकदा इंग्लंडकडून दीर्घ स्वरूपात खेळताना दिसणार आहे. कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, “खेळपट्टी नेहमीसारखीच असून सूर्य बाहेर आहे म्हणून आम्ही फलंदाजी करत आहोत. वातावरण चांगले आहे आणि आतापर्यंत दोन उत्तम कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. आम्हाला लॉर्ड्सला २-१ अशी आघाडी घेऊन सोडायचे आहे. शरीर ठीक आहे आणि सर्व खेळाडू देखील ताजेतवाने आहेत. सर्वांना लॉर्ड्सवर खेळायला खूप आवडते आणि आपण त्याचा आनंद घ्यायाला हवा. सामना वेगाने बदलत आहे, म्हणून आम्ही वेळेचा योग्य वापर केला आहे.”
हेही वाचा : Ind vs Eng 3rd Test : ‘यॉर्कर किंग’ बूमराह लॉर्ड्सवर रचणार इतिहास! इशांतचा ‘हा’ विक्रम धोक्यात; वाचा सविस्तर
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह भारतीय संघात पुन्हा एकदा परतला आहे, त्याने प्रसिद्ध कृष्णाची जागा घेतली आहे. नाणेफेकीनंतर भारतीय कर्णधार शुभमन गिल म्हणाला, “मी सकाळपर्यंत गोंधळलेला होतो की काय करावे. मी कदाचित प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. जर विकेटमध्ये काही असेल तर ते सुरुवातीलाच असणारआहे.” तो पुढे म्हणाला की, “गेल्या सामन्यात सर्वांचे योगदान उत्कृष्ट राहिले होते, आम्हाला देखील हेच हवे होते. गोलंदाज आत्मविश्वासाने भरलेले असून एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर इतके बळी घेणे नक्कीच सोपे नव्हते.” या सामन्यात दोन्ही संघांच्या स्टार गोलंदाजांच्या पुनरागमनामुळे, हा कसोटी सामना खूप रंजक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर विजयी आघाडी मिळवणे दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.