यशस्वी जयस्वाल(फोटो-सोशल मीडिया)
Yashasvi Jaiswal breaks 51-year-old record : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाअखेर भारताने ५ गडी गमावत ३१० धावा केल्या आहेत. तर कर्णधार शुभमन गिल ११४ धावा आणि रवींद्र जाडेजा ४१ धावांवर नाबाद आहेत. या सामन्यात भारताकडून यशस्वी जयस्वालने देखील शानदार अर्धशतक झळकावले आहे. त्याने ८७ धावांची खेळी केली आहे. पहिल्या डावात तो शतक झळकावण्यास हुकला असला तरी, त्याच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या खेळीसह त्याने एक विक्रम देखील मोडीत काढला आहे.
यशस्वी दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध निर्भयपणे फलंदाजी करताना दिसून आला. या डावात त्याने १०३ चेंडूंचा सामना करत ८७ धावा केल्या. परंतु, त्याला इंग्लिश कर्णधाराने माघारी पाठवले. एजबॅस्टन येथे शतक झळकावण्यापासून जयस्वाल फक्त १३ धावा दूर राहिला. असे असून देखील त्याने बर्मिंगहॅमच्या या मैदानावर ५१ वर्षांचा विक्रम मोडलाया आहे.
हेही वाचा : IND vs ENG : मागील 4 वर्षात कॅप्टन गिलने या देशाच्या विरुद्ध केल्या सर्वाधिक धावा! आकडे पाहून बसेल धक्का
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ८७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार लगावले. यासह, जयस्वालने बर्मिंगहॅमच्या मैदानावर ५१ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. आता तो या मैदानावर सर्वात मोठी खेळी खेळणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. या दरम्यान त्याने सुधीर नाईकचा विक्रम मोडला असून त्यांनी १९७४ मध्ये येथे ७७ धावा केल्या होत्या.
यशस्वी जयस्वालसाठी इंग्लंडचा हा दौरा आतापर्यंतचा सर्वोत्तम जात आहे. त्याने लीड्स कसोटी सामन्यात पहिल्या डावात १०१ धावा ठोकल्या होत्या. आता त्याने एजबॅस्टनच्या पहिल्या डावात देखील आपला फॉर्म कायम ठेवत ८७ धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालने आतापर्यंत एकूण २१ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने १९९० धावा फटकावल्या आहेत. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यापासून फक्त १० धावा दूर आहे.
हेही वाचा : 6,6,6,2,2,6… टेक्सास सुपर किंग्सच्या नव्या सुपरस्टारने मैदानावर केला कहर! संघाला मिळवुन दिला सहावा विजय
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्णधार शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा क्रीजवर उपस्थित होते. गिल ११४ धावांवर आणि रवींद्र जडेजा ४१ धावांवर नाबाद आहेत.